लगबग लगबग बघ कसे हे
आयुष्य असे चालले l
इतिहास ,तत्वज्ञान ,अर्थ
शास्त्र गणित जाहले ll

रमतांना मग इतिहासात
समाधान लाभते l
बालपणीचे रुसवे फुगवे
निरागसता भावते ll

तत्वज्ञान ते कठीण फार
जन्मदात्रीचे असे l
म्हणून तर जगणे ही
गोष्ट सोपी नसे ll

तत्वज्ञान शिकता शिकता
वर्षोनुवर्षे जाती l
अर्थशास्त्र मग शिकण्याची
ती कठीण वेळ येती ll

धावता धावता त्यामागे मग
केस पांढरे होती l
आठवणी मग प्रत्येक क्षणी
इतिहासातच रमती ll

वेळ येई मग शेवटली ती
गणित शिकण्याची l
आयुष्यातील पाप-पुण्ये
मोजत बसण्याची ll

पाप डावी तर पुण्य
उजवीकडे बसते l
प्रयत्ने करूनही समीकरण
अवघड ते भासते ll

मग आठवण येती
ग्रंथ धर्मशास्त्रांची l
पूजा अर्चना कीर्तने अन्
पारायणे करण्याची ll

समीकरण सोडवताना
घंटा वाजे घणघणा l
परीक्षा संपल्याची ती
असे तीव्र वेदना ll

हृदयाची धकधक आता
थांबणार असते l
निकालाची भीती तरीही
दडून मनी बसते ll

जाणीव होते ती आता
सर्वच संपल्याची l
अन् न सुटलेल्या त्या
अर्ध्या समीकरणाची ll


डॉ. सायली जीवन ठाकरे.

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो