जगत होतो वेगळ्याच स्वप्नात , 
स्वप्नात होती बायको , दोन पोर 
अणि हसणारे एक घर || १ || 

पहात  होतो ते स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी,
आणि माझ्या आयुष्यातील
आठवणीतल्या  सोहळ्यांनी || २ || 

बायको सुंदर नटली होती जणू अप्सराच वाटली होती 
आठवताना तिचे हसु लपवत होतो असवे 
तिच्या आठवणीतल्या तिजोरीत
का होते फक्त रूसवे || ३ ||    

तिचे रूसवे काढायला का नव्हता वेळ ?
सीमेवरच्या मैदानात 
का रोजच बंदुकीचा खेळ || ४ ||  

एकदा दीवाळीला गेलो होतो पोराला बंदूक घेऊन 
का लपून बसला तो  
त्या  अवाजाला भीऊन  || ५ ||  

त्या आवाजात त्याने बाप हरवलेला पाहिला होता 
बंदूक चालवणाऱ्याचा त्याला 
का राग आला होता ? || ६ || 

पोरीला घेऊन  गेलो होतो  मोबाईल खेळण्यातला 
आनंद वाटत होता 
दुरूनच हैल्लो  बोलण्यातला ||  ७ || 

आज हैल्लो बोलायला मोबाइल परत वाजला होता 
फरक फ़क्त एवढाच 
तो आवाज मात्र हरवला होता || ८ || 

तिरंग्यात गुंडाळलेला मी 
पांढऱ्या साडीत बायको पहात  होतो 
तोफांच्या सलामीत  मी 
वंदे  मातरम गात होतो || ९  || 

लेखन : डॉ.सायली ठाकरे