।। संत तुकोबाराय गाथा चिंतन ( निवडक) ।।

श्री.विश्वनाथजी वारींगे महाराज

१.

सावध झालो सावध झालो | हरीच्या आलो जगरणा ||१||
जेथे वैष्णवांचे भार | जयजयकार गर्जतसे ||२||
पळोनी गेली झोप | होते पाप आड ते ||३||
तुका म्हणे तया ठाया | बोल छाया कृपेची ||४||

भावार्थ : या अभंगांमध्ये संत तुकोबाराय म्हणतात मी सावध झालो सावध झालो आणि हरीच्या जागरणासाठी आलो , ज्या ठिकाणी वैष्णव मोठमोठ्याने श्रीहरीच्या नावाचा जयजयकार करीत आहेत, तुकोबाराय म्हणतात त्या वैष्णवांचा संगतीत माझी अनादी काळाची झोप उडून गेली, सत्कर्मात प्रतिबंध करणारे पापाची ही निवृत्ती झाली, शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी पांडुरंगाच्या कृपेचा ओलावा आहे आणि कृपेची छाया देखील आहे.

२.

हरीच्या जागरणा | जाता कारे न नये मना ||१ ||
कोठे पाहशील तुटी | आयुष्य वेचे फुकासाठी ||२||
ज्यांची तुज गुंती | ते तो मोकलीती अंती ||३||
तुका म्हणे बरा | लाभ काय तो विचारा ||४||

भावार्थ : संसारात गुंतलेल्या पामराला तुकोबाराय म्हणतात ” अरे हरीच्या जागरणाला म्हणजेच भजनाला जायचे तुझ्या मनात का येत नाही रे,” तुझे आयुष्य व्यर्थ चालले आहे याची तूट तू कोठे आणि कशी भरून काढशील ? ,ज्यांच्या विषयी तुला अतिशय आसक्ती आहे अर्थात ज्यांच्या मध्ये तू गुंतला आहेस, ते घर ,संपत्ती, बायका मुले, तुझ्या मृत्यूसमयी तुझी साथ सोडून देतील, तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात आयुष्यात काही लाभ होईल असा विचार करा.

३.

निंदी कोणी मारी | वंदी कोणी पूजा करी ||१||
मज हेही नाही तेही नाही | वेगळा दोही पासोनी ||२||
देहभोग भोगे घडे | जे जे जोडे ते ते बरे ||३||
अवघे पावे नारायणी | जनार्दनीं तुकयाचे ||४||

भावार्थ : या अभंगातून तुकोबारायांच्या अवस्थेचे दर्शन होते, महाराज म्हणतात माझी कोणी निंदा करो अथवा मला कोणी मारो, कोणी आम्हाला नमस्कार करो अथवा पूजा करोत, निंदा केली किंवा मारले त्याचे दुःख नाही आणि कोणी नमस्कार करून पूजा केली त्याचे सुख ही नाही मला दोन्ही नाही,कारण मी या दोन्ही पासून वेगळा आहे. देहाला होणारे सुख दुःखाचे भोग हे केवळ प्रारब्धामुळे होतात, त्यामुळे जे जे घडते ते बरे च आहे. आम्ही सतत भगवदचिंतनामध्ये आमचे सर्व भोग त्या नारायणाकडे म्हणजे या विश्वामध्ये व्यपलेल्या माझ्या स्वामींकडे जातात.

४.

हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥

भावार्थ : या अभंगात तुकोबाराय संतांचा परिचय करून देतात, संत कसे असतात हे समाजाला कळण्यासाठी तुकोबाराय दोन दृष्टांत देतात त्यापैकी पहिला दृष्टांत आहे तो हिऱ्याचा,खरा हिरा कसा पारखावा तर हिरा ऐरणीवर ठेऊन त्याच्यावर घणाचा आघात जरी केला तरी तो फुटत नाही, उलट तो ऐरणीमध्ये घुसून जातो, मोहऱ्याला जर सुत म्हणजे धागा गुंडाळून आगीत टाकला तर सुत जळत नाही, तुकोबाराय म्हणतात संतांचे तसेच आहे,जे खरे संत आहेत त्यांना लोकांनी छळण्यासाठी कितीही आघात केले,तरी ते सहन करीत असतात.

५ .

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥

भावार्थ : तुकोबाराय म्हणतात तुला उपदेश करत आहोत ,मागे अविवेकाने आयुष्याचा नाश केला तो केला परंतु इथुन पुढे तरी आयुष्याचा नाश करू नका, सर्वांच्या पायी मी दण्डवत करून विनंती करीत आहे,तुम्ही आपले चित्त शुद्ध करा, चित शुद्ध करून ज्यामध्ये खरे हीत आहे असे देवाचे चिंतन करा. महाराज म्हणतात ज्या मध्ये तुम्हाला लाभ होणार आहे,असा व्यापार करा हे का फार शिकवायची गरज आहे का ?

६ .

आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥

भावार्थ : दुसऱ्याच्या घाताने ज्याच्या चित्ताला समाधान मिळते , हे पापी माणसाचे लक्षण आहे,जो शीघ्रकोपी आहे,त्याला नरकातच वास मिळेल , दुसऱ्याचे दोष कान पसरून ऐकणे आणि मुखाने इतरांचे दोष वाखाणने, भांडण केल्या वाचून त्याच्या वाणीला धीर निघत नाही, ही पापी माणसाची लक्षणे आहेत.

७.

इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥

भावार्थ : तुकोबाराय मनुष्य देहाचे महत्व सांगून, स्वतःबद्दल धन्यतेचे उद्गार या अभंगातून काढतात, मृत्यूलोकातील या नरदेहाची अपेक्षा ज्यांना दिव्य देह मिळाला आहे असे स्वर्गातील देव करतात, तुकोबाराय म्हणतात खरंच आम्हाला हा नरदेह मिळाला आणि त्याचे महत्व जाणून आम्ही विठोबाचे दास झालो आमचा जन्म धन्य म्हणावा लागेल, आम्ही आता स्वर्गाची पायरी करून मोक्षपदा पर्यत जाऊ,

८.

एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥२॥
तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥

भावार्थ : तूकोबाराय या अभंगातून उपदेश करतात, एकजण स्मशानात चित्तेवर जळत असताना,त्याला जळताना पाहून तुम्ही त्याला जाळणारे का बरं सावध होत नाही ? सावध व्हा आणि जो पर्यत तो मृत्यू आला नाही तोंपर्यत त्या परमात्म्याला भयाने अट्टाहासाने हाक मारा. जिवाने मरणाची गाठोडी सोबतच आणली आहे, जिवंत आहात तो पर्यत परमात्म्याचे भजनं करा,एका परमात्म्या शिवाय सुखाचे जेवढे मार्ग आहेत त्यांचा धिक्कार आहे, एकदा मृत्यू आला की तो हालचाल करून देत नाही.या अभंगाचे तात्पर्य मृत्यू येण्या आधी सावध होऊन आपले आत्मकल्याण करा.

९.

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥

भावार्थ : संत तुकोबाराय या अभंगातून प्रत्यक्ष अनुभवच महत्वाचा असतो हे दृष्टांताने पटवून देतात,
महाराज म्हणतात ” शिजलेल्या अन्नाच्या वासाने जर भूक भागली असती तर लोकांनी घरोघरी स्वयंपाक बनवून भोजन कशाला केले असते ?.
म्हणून तुम्हाला आपले स्वहित करायचे असेल तर तुम्ही स्वतः वाणीने राम राम स्मरण करा आणि आपले हीत करा. महाराज पुढे म्हणतात ” पाणी केवळ डोळ्यानी पाहून तहान भागली असती तर लोकांनी पाणी कशासाठी घरात साठवले असते ? वृक्षाची सावली नुसती पाहून सुख होत नाही, त्या छायेचा अनुभव घेण्यासाठी वृक्षाखाली बसावे लागते. त्याप्रमाणे हरिनाम गाताना ऐकताना जर त्यात आपला दृढ भाव असेल तरच हित होईल. भगवंत आणि भगवद् प्राप्तीची जी साधने आहेत त्यावर विश्वास ठेवूनच मुक्त होता येईल,येथे अहंकारचा काहीच उपयोग होत नाही.

१०.

सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥

भावार्थ : या अभंगातून तुकोबांच्या परोपकारी वृत्तीचे दर्शन घडते. आम्हाला ब्रह्मरस सेवन करून जो आनंद मिळतो तो आनंद आम्ही जगाला ही वाटतो,”तो आनंद तुम्ही घ्या उगाच रानभरी म्हणजे रानोमाळ भटकू नका”, ज्याची पावले समान आहेत असा विटेवर उभा असणारा एक विठ्ठल च जगातील सेवश्रेष्ठ दानशूर दाता आहे. अशा उदार हरीच्या चरणी जर बुद्धी स्थिर झाली तर मनाचे सर्व संकल्प सिद्धीस जातील. महाराज शेवटच्या चरणात म्हणतात हा महत्वाचा निरोप तुमच्या पर्यत पोहचविण्यासाठी देवाने मला पाठवले आहे, हा मार्ग सुखाचा असून सोपा देखील आहे.