।। आहार ।।

शारिरीक विकासामध्ये आहाराचा फार मोठा वाटा आहे.चांगला आणि सकस आहार मिळाला तर अंगप्रत्यांगाची वाढ होऊन कार्यही चांगले होतात.चांगल्या आहारातून चांगली रोगप्रतिकारशक्ती विकसित होते.अति वा अल्प अन्नसेवन शरीरावर परिणाम करतो. अन्न हे दुधारी शस्त्र आहे.
संत तुकाराम म्हणतात……
” अन्नच तारी मारी अन्न नाना विकारी “
शरीराप्रमाणे मन व बुद्धीच्या विकासासाठीसुध्दा आहार तेवढाच महत्त्वाचा आहे. भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेद,योग आणि इतर अध्यात्मिक शास्त्रांमध्येसुध्दा आहारावर सखोल विचार केला आहे.
श्रीमद भगवतगीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये गुणात्मकदृष्ट्या आहाराचे सात्विक , राजस , तामस असे तीन प्रकार वर्णन केले आहेत.

आयु: सत्वबलारोग्यसुखप्रितिविवर्धना:l
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सत्विकप्रिया:l

सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार, त्यांचे आयुष्य वृध्दींगत करतो, जीवनशुध्दी करतो आणि बल आरोग्य सुख आणि संतोष प्रदान करतो.असा आहार रसयुक्त, स्निग्ध ,पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो.

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरुक्षविदहिन:l
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदा:l

रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू ,आंबट, खारट ,गरम ,तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो.असा आहार दुखः ,शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

यातयामं गतरसं पूति पर्युषीतं च यत् l
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम्l
                              
तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव , नासलेले,दुर्गंधीयुक्त,उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते .

आहारमात्रा –
आहाराचे प्रमाण वय,लिंग,प्रकृती,कामाचे स्वरूप यानुसार ठरवावे. सर्वसाधारणपणे आहाराचे प्रमाण किती असावे हे आयुर्वेदात खुप छान सांगितले आहे –

*  उदराचा अर्धा भाग घन पदार्थांनी भरावा.
*  तिसरा भाग द्रव पदार्थ पाणी इ. नी भरावा.
*  चौथा भाग हवेसाठी मोकळा ठेवावा.

अशा मात्रेत आहार सेवन केल्यास पाचक रस अन्नात चांगले मिसळून पचन चांगले होते. खुप पोटभर आकंठ जेवण केल्यास पचन नीट होत नाही.हृदय , फुफ्फुसे यावर दाब पडतो.मोकळा श्वास घेता येत नाही .हालचाल करणे कठीण होते.हळूहळू विकार मूळ धरत जातात.
चरक संहितेमध्ये आहार कसा असावा यासंबधी अतिशय चांगले वर्णन आले आहे –

उष्णम् स्निग्धम् मात्रावत जीर्णेविर्याविद्धम्l
इष्ट देशे इष्टसर्वोपकरणम्l
नातिदृतम् नातिविलंबितम्l
अजल्पन अहसन् तन्मना भुंजितl
आत्मनभिसमिक्ष्य सम्यकl

*उष्ण आहार – आहार नेहमी उष्ण असावा.मात्र अतिउष्ण नसावा.त्यामुळे जीभ भाजून तेथील पेशी मृत होतात .जसे अतिउष्ण खाऊ नये तसे एकदम गार फ्रीजमधीलसुध्दा खाऊ नये.तसेच एकदा तयार केलेले पदार्थ वारंवार गरम करून खाऊ नयेत.

*स्निग्ध आहार – स्निग्ध आहार म्हणजे तूप ,तेल ,लोणी किंवा स्निग्धांश असलेले पदार्थ जसे शेंगदाणे , तीळ,बदाम इ. तुप पित्तशामक व बुद्धिवर्धक आहे.स्निग्ध पदार्थ सांध्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

*जीर्ण – आहार लघु असावा.साधारण तीन तासात अन्न पचले पाहिजे.जड पदार्थ खायचे असतील तर आहारमात्रा
निम्मी असावी.

*विर्याविरूध्द- आहारातून ऊर्जा शक्ति मिळेल असा आहार असावा.सप्तधातुंचे पोषण आहारातून योग्य प्रकारे झाले पाहिजे.

*नातिदृतम् नातिविलंबितम्- अन्नसेवन ठराविक गतीनेच केले पाहिजे. अतिजलद जेवण केल्यास अन्न नीट चावले जाणार नाही , त्यात लाळ पुरेशा प्रमाणात मिसळणार नाही.अन्न पचन नीट होणार नाही . अतिसावकाश जेवले तर अन्न गार होऊन जाते .म्हणून टि.व्ही समोर बसून जेवण करू नये.

*अजल्पन अहसन्- जेवण करतांना बडबड करू नये व हसू नये.अन्नग्रहण करतांना अन्नाशी एकरूप होऊन अन्नग्रहण केले पाहिजे.

*तन्मना भुंजित- तन आणि मन अन्नाशी एकरूप करून प्रसन्न मनाने जेवण करावे.मनात इतर विचार आणू नयेत .जेवण करतांना अन्नाला दूषणे देऊ नयेत .
क्षुधा म्हणजेच जाठराग्निला शांत करण्यासाठी आपण भोजन करत असतो.म्हणून भोजन हे एक यज्ञकर्म आहे अशी भावना ठेऊन जेवावे.

*आत्मनभिसमिक्ष्य सम्यक – घेतले गेलेले भोजन हे आत्म्या पर्यंत पोहोचले पाहिजे.म्हणजे जेवण केल्यानंतर आत्मतृप्तीसुध्दा झाली पाहिजे.

   डॉ. सायली जीवन ठाकरे.
           बी. ए. एम्. एस

।। आयुर्वेद ।।

व्युत्पत्ती-
                        “आयुषो वेद आयुर्वेद:”
         जो आयुष्याचा वेद आहे, तोच आयुर्वेद होय.

                   शरीरेंद्रियसत्वात्मसंयोगे धारी जीवितम् l
                   नित्यगश्चानुबंधश्च पर्यायै: आयु उच्यते ll
                                        ( चरक सुत्रस्थान अध्याय १)

        शरीर , इंद्रीय, सत्व(मन), आत्मा यांच्या संयोगालाच
        आयु म्हणतात.

आयु परिणाम –
          मनुष्याच्या पूर्ण आयुचे मान १०० वर्षे आहे.

आयुर्वेद लक्षण –

            सुखासुखतो हिताहितत: प्रमाणाप्रमाणतश्च,
            यतश्चायुष्याण्यना- युष्याणि च
            द्रव्यगुणकर्माणि वेदयत्यतो अपि आयुर्वेद:l
                                      ( चरक सूत्रस्थान अध्याय ३०)

         तो आपल्या लक्षणांनी ,सुख दुःखानी, हित अहिताने व प्रमाण अप्रमाणाने आयूचे ज्ञान करून देतो,हा आयुष्य आणि अनायुष्य द्रव्य तसेच त्याचे गुणधर्म यांचे ज्ञान देतो म्हणून त्याला आयुर्वेद म्हणतात.

आयुर्वेदाचे स्वरूप –

                हिताहितम् सुखं दुख:म्
                आयु: तस्य हिताहीतम्l
                मानं च तच्च‌ य‌त्रोक्तं
                आयुर्वेद: स उच्यते ll

           हित आयु , अहित आयु, सुखायु आणि दुःखायु तसेच त्या आयुला जे हितकर जे अहितकर आहे ; आयुचे मान आणि त्याच्या लक्षणांचे वर्णन ज्यात आले आहे, तेच आयुर्वेद म्हणून ओळखले जाते.

आयुर्वेदाचे प्रयोजन –

                 प्रयोजनं चास्य ( आयुर्वेदस्य)
                 स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्
                 आतुरस्य विकार प्रशमनम् च l
                                  (चरक सुत्रस्थान अध्याय ३०)

            आयुर्वेद चिकित्साशास्त्राचे २ मुख्य प्रयोजन आहेत.  १) स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे.
            २) रुग्ण व्यक्तीच्या रोगाचे निवारण करणे.

           “धातुसाम्यक्रिया चोक्ता
                    तंत्रास्यास्य प्रयोजनम् l”
                            ( चरक सुत्रस्थान अध्याय १)

             धातूंना सम राखणे हे या तंत्राचे ( आयुर्वेदाचे) प्रयोजन आहे.

                                        संदर्भ – सुश्रुत संहिता
                                                     चरक संहिता
                      शब्दांकन – डॉ.सायली जीवन ठाकरे.

।। योगशास्त्र ।।

वेदांबरोबरच अनेक दिव्य शास्त्रे जसे व्याकरण, ज्योतिष ,गणित इ. भारतात निर्माण झाली, त्यात योगशास्त्राचाही समावेश होतो.भारतीय परंपरेत लिहिली गेलेली ही शास्त्रे म्हणजे जगाच्या संस्कृतीतील मुकुटमणीच होत.योगशास्त्र हे भारतीय परंपरेतील अनेक महान शास्त्रांपैकी एक शास्त्र आहे.योगाचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन,त्याविषयी संशोधन देश परदेशात चालू आहे.
युज् या संस्कृत धातूपासून योग या शब्दाची व्युप्तत्ती झाली असून त्याचा अर्थ जोडणे ,एकत्र आणणे, मिलन घडवून आणणे असा आहे. माणसाच्या जीवनावर मनाची पकड – पगडा असतो हे भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी जाणले.शरीर आणि मनाचा मेळ घालण्याची गरज ओळखून योगशास्त्राची निर्मिती हजारो वर्षांपुर्वी केली गेली.योगशास्त्राला दुसरे नावच मुळी ‘भारतीय मानसशास्त्र’ असे दिले गेले.
आद्य योगशास्त्र रचनाकार पतंजली महामुनींनी यमनियमापासून समधीपर्यंत जो अष्टांग योग सांगितला आहे, त्यातील समाधी पर्यंत पोहोचू शकलो नाही तरीही केवळ आसन, प्राणायाम व थोड्या ध्यानाच्या अभ्यासाने मानवाला सर्वांगीण विकास साधता येतो.समग्र व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. ज्ञानेद्रियांना, मनाला विषयांपासून निवृत्त करणे व मनाला एकाग्र करण्याची प्रक्रिया योग आहे.
भगवान श्रीकृष्ण श्रीमत् भगवतगीतेमध्ये योगाची व्याख्या करतांना म्हणतात…..
‘ समत्वं योग उच्यते ‘
योग माणसाला सम्यक, सद्वृत्ती अवस्थेत आणून सोडतो.
योगावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत.मूळ ग्रंथ जे संदर्भासाठी वापरले जातात त्यापैकी पतंजलींची योगसुत्रे,
हठप्रदिपिका किंवा हठयोग व घेरंड संहिता हे विशेष महत्त्वाचे आहेत. योगशास्त्राचे मूळ प्रणेते पतंजली मुनींनी २५०० वर्षांपुर्वी अवघ्या १९६ सूत्रात योगशास्त्र मांडले आहे. पहिल्या पादाच्या दुसऱ्या सूत्रात त्यांनी योगाची अत्यंत समर्पक आणि व्यापक व्याख्या केली आहे.
‘योग: चित्तवृत्ति निरोध:’
योग म्हणजे चित्तवृत्तींचा किंवा मनात येणाऱ्या संकल्प विकल्पात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया…

योगांगे-
योगशास्त्राची पतांजलींनी आठ अंगांतून मांडणी केली आहे.त्याला ‘अष्टांग योग ‘ म्हटले जाते .
‘यमनियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समधयो अष्टावंगानि l ‘
यम – नियम म्हणजे समाजात आणि स्वतः पाळावयाची बंधने आहेत.अहिंसा , सत्य , अस्तेय, ब्रम्हचर्य , अपरिग्रह हे यम तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान ही स्वतः पाळायची बंधने म्हणजे नियम आहेत आणि ही पाळली गेली तरच पुढची प्रगती वेगाने होणार आहे म्हणून ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
आसनांनी शरीराला दृढता ,आरोग्य व हलकेपणा येतो आणि विचारांची द्वंद्वे कमी होतात.प्राणायामांमुळे मन शांत व एकाग्र होते तर पुढील अंग प्रत्याहारामुळे ज्ञानेंद्रियांची धावपळ कमी होऊन मन अंतर्मुख होते.
अशा शांत,एकाग्र, अंतर्मुख झालेल्या मनाला धारणा ध्यान समाधीच्या साधनेत लावले तर यथार्थ सम्यक ज्ञानाची प्राप्ती होऊन बुद्धी अधिक प्रगल्भ होते आणि माणसाचा मोक्षाकडे प्रवास सुरू होतो.अष्टांग साधनेतून एका समग्र व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.

योगोपचार चिकित्सा-
जुनाट आजार, मानसिक ताणतणावांनी झालेले आजार उदा. उच्च रक्तदाब, दमा , मधुमेह,पाठदुखी इ. योगोपचारांनी नियंत्रणात येत असल्याचे आढळून आले आहे.तसेच पोटाचे विकार, महिलांच्या मासिक पाळीचे व गार्भरपणांच्या समस्यांवरही नियंत्रण येऊ शकते. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांत सुध्दा पूरक चिकित्सा म्हणून योगशास्त्राचा उपयोग होत आहे.योगशास्त्र हे वैद्यकशास्त्र नसले तरीही सर्व रोगप्रतिबंधक नक्कीच आहे.

डॉ.सायली जीवन ठाकरे
बी. ए.एम.एस