।। सुभाषित संग्रह ।।

1) कुक्कुटात् प्रति-उत्थानम् च युद्धम् च बन्धुषु संविभागम् च स्वयम्-आक्रम्य भुक्तम् च (इति) चत्वारि शिक्षेत्।

कोंबडा :- वेळेवर उठणे (किंवा उठू उभे राहणे), (नेहमीच) लढाईसाठी तयारीत राहणे, (जे मिळेल ते) बांधवांबरोबर वाटून घेणे आणि लढून मिळवलेले अन्न खाणे हे चार गुण कोंबड्याकडून शिकण्यासारखे आहेत.

2 ) अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे | पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते ||

अर्थ : दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. लोखंड गरम करतात तेंव्हा पावकाला म्हणजे पवित्र अशा अग्नीला सुद्धा लोखंडाच्या सहवासामुळे घणाचे घाव खावे लागतात.

3) हीयते हि मतिस्तात हीनैः सह समागमात् |
समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ||

अर्थ : बाळा, हलक्या [किंवा कमी बुद्धी असलेल्याच्या] सहवासाने बुद्धीचा क्षय होतो. बरोबरीच्या [आपल्या सारख्याच लोकांच्या] सहवासाने तेवढीच राहते आणि [खूप] विशेष लोकांच्या सहवासाने अधिक चांगली बनते.

४) साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ : ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

५) तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ||

अर्थ : गवतापेक्षाही कापूस हलका असतो, कापसापेक्षा याचक क्षुद्र असतो. [मग प्रश्न असा पडतो की वाऱ्याने त्याला अजून उडवले कसे नाही? तर तो माझ्याजवळ काहीतरी मागेल म्हणून नाही उडवले.

६) पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ : सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे चांगलं वाईट ठरवतात.

७) मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या नाटकातील पहिल्या अंकातला हा श्लोक आहे.

८) दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |
तयोर्विवादं परिहर्तुकामः समागतोऽहं तव दर्शनाय ||

अर्थ : खूप लांबवरून आपली कीर्ति ऐकून कानांच समाधान झालं पण [ आपलं दर्शन लांबून होऊ शकत नसल्याने] डोळे मात्र अतृप्त राहिले. [म्हणून] त्याचं भांडण होऊ लागलं ते मिटवण्यासाठी मी [आपल्या दर्शनाने डोळ्यांना सुखी करण्यासाठी] आलो आहे.
स्वभावं न जहात्येव

 

९)साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||

अर्थ : संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा सुस्वभाव कधीहि सोडत नाही. कापराला अग्नीचा स्पर्श झाला आणि जळून नाहीसा होण्याची वेळ आली तरी ही तो अधिकच सुगंधित होतो.

१०) विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृतं अमेध्यादपि कांचनम्।।

अर्थ : विषामधूनसुद्धा निघाले असले तरी ते अमृत, लहान मुलांकडून ऐकलेली चांगली वचने, शत्रूमधले सद्गुण आणि घाणीमधले सुद्धा सोने या गोष्टी घेण्यासारख्या असतात.

११) पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं च न जहाति ददाति काले सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः

जो आपल्या मित्राला पापांपासून वाचवतो, त्याचे हित साधतो, त्याची गुपिते राखतो, त्याच्या गुणांना प्रसिद्धी देतो (सर्वांना ते सांगतो). संकटसमयी त्याला सोडून जात नाही, वेळेवर त्याच्या उपयोगी पडतो, ही चांगल्या मित्राची लक्षणे आहेत असे संत सांगतात.

१२ ) साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः। तीर्थं फलति कालेन सद्यः साधुसमागमः

साधुसंतांचे दर्शन घेणे हेच पुण्यकर्म आहे कारण ते लोक तीर्थासारखेच असतात. तीर्थाचे फळ मिळायला वेळ लागतो, पण साधुसंतांच्या सहवासाचा लाभ तत्काळ मिळतो.

१३ ) प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः । तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता ॥

अर्थ : आवडणारे बोलणे ऐकून सर्वच लोक खुश होतात म्हणून फक्त तसेच बोलावे, बोलण्यामध्ये दारिद्र्य कशाला ? बोलायला कांही पैसे पडत नाहीत, तेंव्हा ऐकणाऱ्याला आनंद होईल असे चांगले वचन बोलावे.

१४) भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

अर्थ : महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे.

१५)रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ||

अर्थ : राजा, देव, गुरु, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काही वस्तू, फळ देऊन त्याचं फळ मिळवावे.

१६) मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ||

अर्थ : कवि म्हातारपणाचे वर्णन करतो.काळ्या केसांचे पांढरे केस झाले. त्याचा राग येऊन की काय दाताची कवळी तोंडातून निघून गेली. पांढरे असणं हा दातांचा गुण केसांनी चोरला अस वाटून रागावून दात निघून गेले.

१७) दर्शने स्पर्शने वाऽपि श्रवणे भाषणेऽपि वा |
यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते ||

अर्थ : व्यक्तीला पाहिल्यावर, तिला नुसता स्पर्श केला तरी, तिचं बोलण ऐकून, तिच्या बद्दल गोष्टी ऐकून, तिच्याशी बोलून किंवा तिच्याबद्दल बोलून मनात भावना तरंग उठतात असं असेल, तर त्याला प्रेम असं म्हणतात.

१८ ) यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः |
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ||

अर्थ : ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर तेच झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला मदत करणाऱ्याचा सुद्धा नाश करतो.

१९) चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति |
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयम् ||

अर्थ : दारू प्यायल्याने मनात गोंधळ निर्माण होतो. मन थाऱ्यावर नसलं की पापाचरण घडतं. अशा प्रकारे पाप करून मूर्ख लोक नरकात पडतात. त्यामुळे दारू पिऊ नये, मुळीच पिऊ नये.

२०) मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |
भ्रृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

अर्थ : गप्प बसणे, वेळ लावणे, निघून जाणे, जमिनीकडे बघत बसणे, भुवया वाकड्या करणे, दुसर्‍याशीच बोलत बसणे अशा सहा रीतींनी नकार दिला जातो.

२१) साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् |
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति ||

अर्थ : सुशिक्षित [साक्षरा हे बहुवचन आहे] जर उलटले साक्षरा हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतात. अर्थात सुशिक्षित उलटले तर राक्षसांप्रमाणे त्रास देतात ,रा-क्ष-सा उलट सा-क्ष-रा पण सुसंस्कृत सरस उलटले तरी ते सरसत्व स-र-स उलट स-र-स सोडत नाहीत.

२२) मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

अर्थ : जास्त मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर सर्वांशी भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून माणसाने मध्यममार्ग स्वीकारावा.

२३) यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||

अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एक गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे?

२४)कॉऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् ।
को विदेशस्तु विदुषां कः परः प्रियवादिनाम् ॥

अर्थ : खूप शिकलेल्
यांना परदेशात राहणं फार कठीण जात नाही. गोड बोलणाऱ्याना कोणी परका वाटत नाही.

२५) उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि: शक्तिः पराक्रमः ।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥

अर्थ : कामासुपणा , धाडस ,धीरता , हुशारी , ताकद,पराक्रम हे सहा गुण ज्याच्याजवळ असतील त्याला देव मदत करतो.

२६ ) सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||

अर्थ : खरं बोलण हे चांगलं असतं. सत्यपेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे. ज्यामुळे प्राणीमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.

२७ ) नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥

अर्थ : मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ असूनही नम्रपणा असणारा फारच विरळा .

२८) सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ।
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते
प्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते ॥

अर्थ : तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचा मागमूस सुद्धा राहात नाही. पण तेच पाणि जर कमळाच्या पानावर असले तर मोत्याच्या आकाराचे सुंदर दिसते. तेच पाणि जर स्वाती नक्षत्राच्या पावसात समुद्रात दोन शिम्पल्यांमध्ये पोचले तर त्याचं सुंदर मोती तयार होतो. सामान्यतः उत्कृष्ट , मध्यम आणि हीन अशा अवस्था सहवासामुळे लाभत असतात.
हा श्लोक राजा भतृहरीच्या नीतिशतकातला आहे.

२९ ) ईर्षुर्धृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ॥

अर्थ : सतत दुसऱ्याशी स्पर्धा तुलना करणारा, फार सहानुभूति बाळगणारा. असमाधानी, सतत भिणारा किंवा शंका काढणारा, दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा असे सहा जण नेहेमी दुःखी असतात.
विदुर नीति. संस्कृत मधे शंक धातूचा अर्थ भिणे असा आहे.

३०) वस्त्रदानफलं राज्यं पादुकाभ्यां च वाहनम् ।
ताम्बूलाद्भोगमाप्नोति अन्नदानात्फलत्रयम् ॥

अर्थ : वस्त्र दान केल्याने राज्य मिळते ,पादुका म्हणजे चपला दिल्याने वाहन मिळेल, विडा दिल्याने विषय प्राप्त होतात, अन्नदान केल्याने तिन्ही गोष्टी मिळतात.

३१) खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

अर्थ : दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे दोष मोहोरी एवढे असले तरी पाहतो. नावे ठेवतो पण आपले दोष बेलफळा एवढे असले तरी दिसत असूनही न पहिल्यासारखे करतो.
म्हण : दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो