।। दैनंदिन नित्यकर्म ।।

 बाळक्रीडा अभंग क्र.१

देवा आदिदेवा जगत्रयजीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम काहीं कळा ॥धृ॥ कळा तुजपाशी आमुचें जीवन । उचित करून देईं आम्हां ॥३॥ आम्हां शरणागता तुझाचि आधार । तू तंव सागर कृपासिंधु ॥४॥ सिंधू पायवाट होय तुझ्या नामें । जळतील कर्में दुस्तरें तीं ॥५॥ तें फळ उत्तम तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥ सेविलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥ संसार तो काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥८॥ क्षणमात्रे जाळी दोषांचीया राशी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥ करी ब्रीद साचें आपलें आपण । पतितपावन दीनानाथा ॥१०॥ नाथ अनाथांचा पती गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥११॥ चित्तीं जे धरावे तुका म्हणे दासीं । पुरविता होशी मनोरथ ॥१२॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥ शीण झाला वासुदेवदेवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥ दुराचारीयांसी नाही भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥ पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥ गर्भासी तयांच्या आले नारायण । तुटलीं बंधने आपोआप ॥६॥ आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा । बंदाच्या आर्गळा कुलुपें कोंडे ॥७॥ कोंडमारा केला होता बहु दिस । सोडवी निमिष न लागतां ॥८॥ न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरी ॥९॥ नंदाघरी जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोवा सवें देव ॥१०॥ सवें देव तया आड नये काही । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा देव आले ॥२॥ आले अविनाशी धरुनी आकार । दैत्यांचा संहार करावया ॥३॥ करावया भक्तजनांचें पाळण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥ गोकुळी आनंद प्रगटलें सुख । निर्भर ते लोक घरोघरी ॥५॥ घरोघरी झाला लक्षुमीचा वास । दैन्य दारिद्र्यास त्रास आला ॥६॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥ लोकां गोकुळींच्या झाले ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतप ॥८॥ जपतप काय करावी साधनें । जे त्या नारायणें कृपा केली ॥९॥ केली नारायणे आपुली अंकित । तोचि त्यांचे हित सर्व जाणे ॥१०॥ सर्व जाणे एक विष्णू साच खरा । आणिक दुसरा नाहीं नाहीं ॥११॥ नाहीं भक्ता दुजे तिहीं त्रिभुवनी । एका चक्रपाणिवांचुनी त्यां ॥१२॥ त्याच्या सुखासंगे घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजुनियां ॥१३॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.४
त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिहीं तो मुरारी खेळविला ॥१॥ खेळविला जिही अंतर्बाहयसुखे । मेळवूनि मुखे चुंबन दिले ॥२॥ दिले त्यासी सुख अंतरीचे देवे । जिही एका भावे जाणितला ॥३॥ जाणितला तिही कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचे ॥४॥ ज्यांचें कृष्णी तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांती त्या ॥६॥ एकांती त्या जाती हरिसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे । अंतरीचा देणें इच्छाभोग ॥८॥ भोग त्याग नाही दोन्ही तयापासीं । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.५
शिळा स्फटिकची न पालटे शिळा स्फटिकची न पालटे भेदें । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥ फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी माय बाप ॥३॥ मायबापा सोडविले बंदीहुनी । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥ आधिक नाही देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्‍त केली ॥५॥ मुक्‍त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥ पाप कोठें राहे हरि आठविता । भक्‍ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥ साक्षी तयापाशी पूर्वील कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥ देव भोळा धांवे भक्‍ता पाठोवाटी । उच्चारितां कंठी मागेमागें ॥९॥ मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धावे तो घरासीं भाविकांच्या ॥१०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.६
चारी वेद ज्याची कीर्ती चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणींच्या ॥१॥ गौळणी त्या गळा बांधिती धारणी । पायां चक्रपाणि लागे तया ॥२॥ तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरें माजीं ॥३॥ माजी शिरोनिया नवनीत खाय । कवाड तें आहे जैसे तैसे ॥४॥ जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारिं । म्हणउनि चोरी न संपडे ॥५॥ न संपडे तया करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥ वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥ निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ त्या ध्यानीं कृष्णध्यानें ॥८॥ नये क्षणभरी योगियांचे ध्यानी । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥ भाविका तयांसी येतो काकुलती। शहाण्या मरती न संपडे ॥१०॥ नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणे भावें चाड एका ॥११॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.७
चाड अनन्याची धरी चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणे बरीं नाहीं म्हूण ॥२॥ न संपडे इंद्र चंद्र ब्रम्हादिकां । अभिमाने एका तिळमात्रे ॥३॥ तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥ दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाही नारायणा भजले जे ॥७॥ जे नाही भजले एका भावे हरि । तया दंड करी यमधर्म ॥८॥ यमधर्म म्हणे तया दोषियांसी । का रे केशवासी चुकलेती ॥९॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हा कान डोळे मुख ॥१०॥ कान डोळे मुख संतांची संगती । न धराच चित्ती सांगितले ॥११॥ सांगितले संती तुम्हा उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥ दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥ दुर्जनाचा येणे करूनि संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ॥१४॥ रामकृष्णनामे रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्या ॥१५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.८
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्ते समर्पिलीं ॥२॥ समर्थ ते गाती हरिचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥ रामकृष्णे केलें कौतुक गोकुळी । गोपाळांचे मेळी गाई चारी ॥४॥ गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५॥ काय गौळियांच्या होत्या पुण्यराशी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥६॥ सुख तें अमुप लुटिले सकळी । गोपिका गोपाळी धणीवरि ॥७॥ धणीवरि त्यांसी सांगितली मात । ज्यांचे जैसें आर्त तयापरी ॥८॥ परी याचे तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासी ॥९॥ शिक लावूनिया घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेचि तो ॥१०॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुके । शिव्या देता सुखे हासतसें ॥११॥ हासतसे शिव्या देता त्या गौळणी । मरता जपध्यानी न बोले तो ॥१२॥ तो जें जें करी ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.९
वर्म दावी सोपें भाविका वर्म दावी सोपें भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देव ते गौरव सुखें मानी ॥२॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥ वस्त्रे घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥ तिहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥ त्यांच्या वचनाची पुष्पे वाहे शिरी । नैवेद्य त्यांकरी कवळ मागें ॥६॥ त्यांचिये मुखीचें हरोनियां घ्यावे । उच्छिष्ट ते खावें धणीवरी ॥७॥ वरी माथा गुंफे मोरपिसावेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदे ॥८॥ छंदे नाचतील जयासवे हरि । देहभाव वरी विसरली ॥९॥ विसरली वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥१०॥ पूजा भाविकाची न कळता घ्यावी । न मागता दावी निज ठाव ॥११॥ ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१०
भक्तजना दिलें निजसुख भक्तजना दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरी हरि ॠणी ॥२॥ रुसलिया त्यांचे करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥ क्रिया करी तुम्हा न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥ गोपिकांसी म्हणे वैकुंठीचा पति । तुम्ही माझ्या चित्ती सर्वभावे ॥५॥ भाव जैसा तुम्ही माझ्या ठायी धरा । तैसा चि मी खरा तुम्हा लागी ॥६॥ तुम्हा कळो द्या माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हा ग्वाही ॥७॥ ग्वाही तुम्हा आम्हा असे नारायण। आपलीच आण वाहतसे ॥८॥ सत्य बोले देव भक्तिभाव जैसा। अनुभवे रसा आणूनिया ॥९॥ त्यांसी बुझावितो वेगळाल्या भावे । एकीचे हे ठावे नाही एकी ॥१०॥ एक क्रिया नाही अवघियांचा भाव । पृथक हा देव देतो तैसे ॥११॥ तैसे कळो नेदी जो मी कोठे नाही । अवघियांचे ठायी जैसा तैसा ॥१२॥ जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥१३॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥ गोकुळींच्या लोका लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्ती॥१५॥ चित्तें चोरूनियां घेतली सकळा । आवडी गोपाळांवरी तया ॥१६॥ तयासी आवडे वैकुंठनायक । गेली सकळिक विसरोनि ॥१७॥ निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाही या देहाची शुध्दि कोणा ॥१८॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥ देती टाकुनियां भ्रतारांसी घरी । लाज ते अंतरी आथीच ना ॥२०॥ नाही कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मने ॥२१॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.११
मनें हरिरूपी गुंतल्या मनें हरिरूपी गुंतल्या वासना । उदास त्या सुना गौळियांच्या ॥१॥ त्यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापें भोग करी ॥२॥ करी कवतुक त्यांचे तयापरी । एका दिसे हरि एका लेंक ॥३॥ एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीती तैसे रूप ॥४॥ रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥ लेकरू न कळे स्थूळ की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥ कवतुक केले सोंग बहु रूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१२
जगाचा हा बाप दाखविलें जगाचा हा बाप दाखविलें मायें । माती खातां जाय मारावया ॥१॥ मारावया तिनें उगारिली काठी । भुवने त्या पोटी चौदा देखे ॥२॥ देखे भयानक झाकियेले डोळे । मागुता तो खेळे तिये पुढे ॥३॥ पुढे रिघोनिया घाली गळा कव । कळो नेदी माव मायावंता ॥४॥ मायावंत हरिरूप काय जाणे । माझे माझे म्हणे देवा बाळ ॥५॥ बाळपणी रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥ गळा बांधुनिया उखळासी दावे । उन्मळी त्या भावे विमळार्जुन ॥७॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातले मोहन गौळियांसी ॥८॥ सिंकी उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥ तरी दूध डेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥ दुणी जाले त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनिया ॥११॥ आशाबध्दा देव असोनि जवळी । नेणती ते काळी स्वार्थामुळे ॥१२॥ मुळ यांचा देव न कळे तयांसी । चित्त आशापाशी गोवियेले ॥१३॥ लेकरू आमचे म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तोचि भाव ॥१४॥ भाव दावावया चरित्र दाखवी। घुसळिता रवी डेरियात ॥१५॥ डेरियात लोणी खादले रिघोनि । पाहे तो गौळणी हाती लागे ॥१६॥ हाती धरूनिया काढिला बाहेरी। देखोनिया करी चोज त्यासी ॥१७॥ सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियात ॥१८॥ यासी पुत्रलोभे न कळे हा भाव । कळो नेदी माव देव त्यांसी ॥१९॥ त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देव आपणास कळो नेदी ॥२०॥ नेदी राहो भाव लोभिकांचे चित्ती। जाणता चि होती अंधळी ती ॥२१॥ अंधळी ती तुका म्हणे संवसारी । जिही नाही हरि ओळखिला ॥२२॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१३
ओळखी तयांसी होय एका ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥ न पविजे कदा उन्मत्त झालीया । दंभ तोचि वाया नागवण ॥२॥ वनवास देवाकारणे एकांत । करावी ही व्रत तपे याग॥३॥ व्रत याग यांसी फळली बहुते । होतीया संचिते गौळियांची ॥४॥ यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होते ॥५॥ होते ते द्यावया आला नारायण । मायबापा ऋण गौळियांचे ॥६॥ गौळियांचे सुख दुर्लभ आणिकां । नाही ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१४
नेणतीयांसाठीं नेणता नेणतीयांसाठीं नेणता लहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥ माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तया वरी ॥२॥ तया वरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥ घेउनिया एके ठायी अवतार । एकी केला थोर वाढवूनि ॥४॥ उणा पुरा यासी नाही कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥ यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥ वाढला तो सेवाभक्तिचिया गुणे । उपचार मिष्टान्ने करूनिया ॥७॥ करोनिया सायास मेळविले धन । ते ही कृष्णार्पण केले तीही ॥८॥ कृष्णासी सकळ गाई घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवे भाव ॥९॥ जीवे भावे त्याची करितील सेवा । न विसंबती नावा क्षणभरी ॥१०॥ क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥ त्यांचे ध्यानी मनी सर्वभावे हरि । देह काम करी चित्त त्यापे ॥१२॥ त्याचेचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाही कृष्ण ॥१३॥ कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटो कृष्णा ॥१४॥ कृष्ण गाता ओव्या दळणी कांडणी । कृष्ण हा भोजनी पाचारिती ॥१५॥ कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी । कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥१६॥ कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चिता । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१५
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा परिचारी कृष्ण हा व्यवहारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥ म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हा गमे । वेळ हा करमे वायाविण ॥२॥ वायाविण तुम्हीं पिटीतां चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनिया ॥४॥ याचे सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारी न फिराल ॥५॥ लटिके हे तुम्हां वाटेल खेळणे । एका कृष्णाविणे आवघेचि ॥६॥ अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥ नावडे तुम्हांस आणीक बोलिले । मग हे लागले कृष्णध्यान ॥८॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिक ही ॥९॥ आणिक ही तुम्हां येती काकुलती। जवळी इच्छिती क्षण बैसो ॥१०॥ बैसो चला पाहो गोपाळाचे मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥ सांगे जव ऐसी मात दसवंती । तव धरिती चित्ती बाळा ॥१२॥ बाळा एकी घरा घेउनिया जाती । नाही त्या परती तुका म्हणे ॥१३॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१६
तुका म्हणे पुन्हा तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥ याच्या मुखें नये डोळीयांसी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥३॥ तटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥ विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार असों कोठें ॥५॥ कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥ विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥ एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंक भातुकें खेळतील ॥८॥ खेळती भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित चित्त त्यांचे ॥९॥ चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥ करूनीं आपला वघा गोविंद । जना साच छंद लटिका त्या ॥१२॥ त्यांनी केला हरि सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥ भावना राहिली एकाचियां ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१७
गोविंद भ्रतार गोविंद गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एकचि तो ॥१॥ एकाचीच नामें ठेवियेली दोनी । कल्पितील मनी यावें जावें ॥२॥ जावे यावे तिही घरीचिया घरी । तेथिची सिदोरी तेथे न्यावी ॥३॥ विचारिता दिसे येणे जाणे खोटे । दाविती गोमटे लोका ऐसे ॥४॥ लोक करूनिया साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥ लटिकी करिती मंगळदायके । लटिकीच एके एका व्याही ॥६॥ व्याही भाई हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायी केला एक ॥७॥ एकासिच पावे जे काही करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥ लटिकाच त्यांणी केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥ त्यांणी मृत्तिकेचे करूनि अवघे । खेळतील दोघे पुरुषनारी ॥११॥ पुरुषनारी त्यांणी ठेवियेली नावे । कवतुकभावे विचरती ॥१२॥ विचरती जैसे साच भावे लोक । तैसे नाही सुख खेळतीया ॥१३॥ यांनी जाणितले आपआपणया । लटिके हे वाया खेळतो ते ॥१४॥ खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर । म्हणोनि विकार नाही तया ॥१५॥ तया ठावे आहे आम्ही अवघी एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥ तया ठावे नाही हरिचिया गुणे । आम्ही कोणकोणे काय खेळो ॥१७॥ काय खातो आम्ही कासया सांगाते । कैसे हे लागते नेणो मुखी ॥१८॥ मुखी चवी नाही वरी अंगी लाज । वर्ण याती काज न धरिती ॥१९॥ धरितील काही संकोच त्या मना । हासता या जना नाइकती॥२०॥ नाइकती बोल आणिकांचे कानी । हरि चित्ती मनी बैसलासे ॥२१॥ बैसलासे हरि जयाचिये चित्ती। तया नावडती मायबापे ॥२२॥ मायबापे त्यांची नेती पाचारुनि । बळे परि मनी हरि वसे ॥२३॥ वसतील बाळा आपलाले घरी । ध्यान त्या अंतरी गोविंदाचे ॥२४॥ गोविंदाचे ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥ न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जाले ॥२६॥ एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागी तैशा ॥२७॥ तैसा त्यांचा भाव घेतला त्या परी । तुका म्हणे हरि बाळलीला॥२८॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.१८
लीळाविग्रही तो लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥२॥ नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हाते त्यासि ॥३॥ हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥४॥ पोट धाले मग देतसे ढेकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥५॥ तुळसीदळ भावे सहित देवा पाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥ क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥७॥ देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्या ठायी ॥८॥ त्यांचा हा अंकित सर्व भावे हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥ बाळक्रीडा अभंग क्र.१९ जियेवेळीं चोरूनियां जियेवेळीं चोरूनियां नेली वत्से । तयालागी तैसें होणें लागे ॥१॥ लागे दोहों ठायी करावे पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥ माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरी वत्से जीची तैसा झाला ॥३॥ झाला तैसा जैसे घरिचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पावे ॥४॥ मोहरी पावे सिंगे वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकी ॥५॥ ब्रम्हादिका सुख स्वप्‍नी तेंही नाही । तैसे दोही ठायी वोसंडले ॥६॥ वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला ॥७॥ लाघव कळले ब्रम्हयासी याचे । परब्रम्ह साचे अवतरले ॥८॥ तरले हे जन सकळ ही आता । ऐसे तो विधाता बोलियेला ॥९॥ लागला हे स्तुती करू अनंताची । चतुर्मुखें वाची भक्ती स्तोत्रे ॥१०॥ भक्तिकाजे देवे केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥ पृथिवी दाटीली होती या असुरी । न साहावे वरी भार तये ॥१२॥ तया काकुलती आपल्या दासांची । तयालागी वेची सर्वस्व ही ॥१३॥ स्वहित दासांचे करावया लागी । अव्यक्त हे जगी व्यक्ती आले ॥१४॥ लेखा कोण करी याचिया पुण्याचा । जया सवे वाचा बोले हरि ॥१५॥ हरि नाममात्रे पातकांच्या राशी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥ गौळिये अवघी जाली कृष्णमय । नामे लोकत्रय तरतील ॥१७॥ तरतील नामे कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशी होइल पाप ॥१८॥ पाप ऐसे नाही कृष्णनामे राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥ मुख माझे काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥ ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥ देव चि अवघा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्से तेथे ॥२२॥ तेथे पाहाणे जे आणीक दुसरे । मूर्ख त्या अंतरे दुजा नाही ॥२३॥ दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२०
कुंभपाक लागे तयासि कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यम करी ॥२॥ कळला हा देव तयासीच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥ ब्रम्हादिका ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥ जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे व्हावें संचित हे ॥५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२१
संचित उत्तम भूमि संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊ नेदी वाया परि त्याचे ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥ गाई दवडुनि घालिती बाहेरी । तव म्हणे हरि बांधा त्याही ॥३॥ त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडयातुनि ॥४॥ पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥ नारायण नांदे जयाचिये ठायी । सहज तेथे नाही घालमेली ॥६॥ मेली ही शहाणी करिता सायास । नाही सुखलेश तुका म्हणे ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२२
तुका म्हणे सुख घेतलें तुका म्हणे सुख घेतलें गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥१॥ करूनिया टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥ दगडाचे टाळ कोण त्याचा नाद । गीत गाता छंद ताल नाही ॥३॥ ताल नाही गातां नाचतां गोपाळा । घननीळ सावळा तयामध्ये ॥४॥ मध्ये जया हरि ते सुख आगळे । देहभाव काळे नाही तया ॥५॥ तयांसि आळंगी आपुलिया करी । जाती भूमीवरी लोटांगणी ॥६॥ निजभाव देखे जयाचिये अंगी । तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२३
तयांसवें करी काला तयांसवें करी काला दहींभात । शिदोऱ्या अनंत मेळवुनि ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायी । मागे पुढे काही उरो नेदी ॥२॥ नेदी चोरी करू जाणे अंतरीचे । आपले ही साचे द्यावे तेथे॥३॥ द्यावा दही भात आपला प्रकार । तयाचा व्यवव्हार सांडवावा ॥४॥ वाटी सकळांसि हाते आपुलिया । जैसे मागे तया तैसे द्यावे ॥५॥ द्यावे सांभाळुनी समतुकभावे । आपण हि खावे त्यांचे तुकें ॥६॥ तुक सकळांचे गोविंदाचे हाती । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥ राखे त्यासि तैसे आपलाल्या भावे । विचारुनि द्यावे जैसे तैसे ॥८॥ तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका । ते दिले भाविका गोपाळांसि ॥९॥ गोपाळांचे मुखी देउनी कवळ । घास माखे लाळ खायत्याची ॥१०॥ त्यांचिये मुखी चे काढूनिया घास। झोंबता हातास खाय बळे ॥११॥ बळे जयाचिया ठेंगणे सकळ । तयाते गोपाळ पाडितील ॥१२॥ पाठी उचलूनि वाहातील खांदी । नाचतील मांदी मेळवुनी ॥१३॥ मांदी मेळवुनी धणी दिली आम्हा । तुका म्हणे जमा केल्या गाई ॥१४॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२४
केला पुढे हरि केला पुढे हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्णराम तयां सोयी ॥२॥ सोयी लागलिया तयांची आवर्ती । न बोलविता येती मागे तया ॥३॥ तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्य नित्य तेचि सुख ॥४॥ सुख नाही कोणा हरिच्या वियोगे । तुका म्हणे युगे घडी जाय ॥५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२५
जाय फाकोनियां निवडोनी जाय फाकोनियां निवडोनी गाई । आपलाले सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचा जीव गोविंदापे॥२॥ गोविंदे वेधिले तुका म्हणे मन । वियोगे ही ध्यान संयोगाचे ॥३॥ माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२६
संयोग सकळां असे संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिले ॥२॥ उतरूनि हाते धरि हनुवटी । ओवाळूनि दिठी सांडियेली॥३॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥ लहान हा थोर जीवजंत भूते । आपण दैवते झाला देवी ॥५॥ देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥ हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२७
भक्तीसाठीं करी यशोदेसी भक्तीसाठीं करी यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनिया धरिले मोहन । माय म्हणे कोण येथे दुजे ॥२॥ दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥ देवापाशी पुसे देव काय जाला । हासे आले बोला याचे हरि ॥४॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिके मानिती साच खरे ॥५॥ लटिके ते साच साच ते लटिके । नेणती लोभिके आशाबध्द ॥६॥ सांग म्हणे माय येरु वासी तोड । तंव ते ब्रम्हांड देखे माजी ॥७॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणे । तो भक्तांकारणे बाळलीला ॥८॥ लीळा कोण जाणे याचे महिमान । जगाचे जीवन देवा देव ॥९॥ देवे कवतुक दाखविले तया । लागतील पाया मायबापें ॥१०॥ मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणे । माझे हे करणे तो हि मीच ॥१२॥ मीच म्हणउनि जे जे जेथे ध्याती । तेथे मी श्रीपति भोगिता ते ॥१३॥ ते मज वेगळे मी तया निराळा । नाही या सकळा ब्रम्हाडांत ॥१४॥ तद्‌भावना इच्छा भावितसे त्यांचे । फळ देता साचे मीच एक ॥१५॥ मीच एक खरा बोले नारायण । दाविले निर्वाण निजदासां ॥१६॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूती नारायण ॥१७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२८
नारायण भूतीं न कळे नारायण भूतीं न कळे जयांसि । तयां गर्भवासी येणें जाणें ॥१॥ येणें जाणें होय भूतांच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥२॥ देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ देहबुद्धी ॥३॥ बुध्दीचा पालट नव्हे कदा काळी । हरि जळी स्थळी तया चित्ती ॥४॥ चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥ तयामाजी हरि जाणिजे त्या भावे । आपले परावे सारिखे चि ॥६॥ चिंतने तयाच्या तरती आणीक । जो हे सकळिक देव देखे ॥७॥ देव देखे तो ही देव कैसा नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥ काया वाचा मने पूजावे वैष्णव । मनी शुद्ध भाव धरूनिया ॥९॥ यांसि कवतुक दाखविले रानी । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥ गोपाळांसि डोळे झांकविले हाते । धरिले अनंते विश्वरूप ॥११॥ पसरूनि मुख गिळियेले ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥ संधि सारूनिया पाहिले अनंता । म्हणती ते आता कळलासी ॥१३॥ कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥ तो तया कळला आरुषां गोपाळा । दुर्गम सकळा साधनांसि ॥१५॥ शीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकासि साचा भाव दावी ॥१६॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.२९
भाव दावी शुध्द भाव दावी शुध्द देखोनियां चित्त । आपल्या अंकिता निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसी काय पुण्य होते । वाचलो जळते आगीहातीं ॥२॥ आजी आम्हां येथें वांचविलें देवे । नाही तरी जीवे न वांचतो ॥३॥ न वांचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळे वाचविलें ॥४॥ पूर्वपुण्य होते तुमचियां गांठी । बोले जगजेठी गोपाळांसी ॥५॥ गोपाळांसी म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥ करी तुका म्हणे करवी आपण । द्यावे थोरपण सेवकांसी ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३०
काय आम्हां चाळविसी काय आम्हां चाळविसी वायाविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनिया डोळे नव्हतो दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥ होती दृष्टि आत उघडी आमची । बाहेरी ते वाया चि कुंची झाकू ॥३॥ जालासि थोरला थोरल्या तोडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥ आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदे नाचती भोवताली ॥५॥ भोवती आपणा मेळविली देवे । तुका म्हणे ठावे नाही ज्ञान ॥६॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३१
नाहीं त्याची शंका नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥ जाणतियां सवे येऊ नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥२॥ वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥ दुरावले दूर आशाबध्द देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥४॥ चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥ नरक साधिला विसरोनि देवा । बुडाले ते भवनदीमाजी ॥६॥ जिही हरिसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३२
खेळीमेळी आले घरा खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥ मातेपाशी एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥ ओवाळिले तिने करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसी ॥३॥ पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥ कवतुक कानी आइकता त्याचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥ तेव्हा कवतुक कळो आले काही । हळुहळु दोही मायबापां ॥७॥ हळुहळु त्यांचें पुण्य जाले वाड । वारले हे जाड तिमिराचे ॥८॥ तिमिर हे तेथे राहो शके कैसे । झालिया प्रकाशे गोविंदाच्या ॥९॥ दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे ते क्षणामाजीं एका ॥१०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३३
काय आतां यासि काय आतां यासि म्हणावे लेकरू । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली लपून । कळो नये क्षण एक होता ॥२॥ क्षण एक होता विसरली त्यासी । माझे माझे ऐसे करी बाळा ॥३॥ करी कवतुक कळो नेदी कोणा । योजूनि कारणा तेचि खेळे ॥४॥ ते सुख लुटिले घरिचिया घरी । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३४
आपुलाल्यापरी आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥ खेळ मांडियेला यमुनेपाबळी । या रे चेंडुफळी खेळू आतां ॥२॥ आणविल्या डांगा चवगुणांतू काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥ जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयांसी उपाव तो चि सांगे ॥५॥ सांगे सकळांसी व्हा रे एकीठायीं । चेंडू राखा भाई तुम्ही माझा ॥६॥ मज हा नलगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । न वजा बरळ एकमेका ॥८॥ एका समतुके अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥ चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकलाचि ॥१०॥ चिंतूनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहातचि ॥११॥ पाहातचि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥ धरावा तयाने त्याचे बळ त्यासी । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥ नव्हे काम बळ बुध्दि नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥ विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ माझ्यामागे ॥१५॥ मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥ चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय माग पाहोनिया ॥१७॥ या मागे जे आले गोविंदा गोपाळ । ते नेले शीतळ पंथ ठाया ॥१८॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तया मागे त्याचे ते चि हाल ॥१९॥ हाल दोघा एक मोहरा मागिला । चालता चुकला वाट पंथ ॥२०॥ पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥ वयाचा प्रबोध विचार ज्या नाही । समान तो देही बाळकांसी ॥२२॥ शिकविले हित नाईके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥ नये ते चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥ रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥ लाज सांडूनिया मारितील हाका । कळले नायका वैकुंठीच्या ॥२६॥ चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानी । सोयी चक्रपाणि पावविले ॥२८॥ सोयी धरूनिया आले हरिपाशी । लहान थोरांसी सांभाळिले ॥२९॥ सांभाळिले तुका म्हणे सकळही । सुखी झालें तेही हरिमुखे॥३०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३५
मुखे सांगे त्यांसी मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पहा । उदकांत डोहाचियां माथा ॥१॥ माथा कळंबाचे अवघडा ठायी । दावियेला डोही जळामाजी ॥२॥ जळात पाहाता हाडतिये दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसे नव्हे ॥३॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आत । खरा तेथे चित्त लावा वरी ॥४॥ वरी देखियेला अवघ्यांनी डोळा । म्हणती गोपाळा आता कैसे ॥५॥ कैसे करूनिया उतरावा खाली । देखोनिया भ्याली अवघी डोहो ॥६॥ डोहो बहु खोल काळया भीतरी । सरली माघारी अवघी जणे ॥७॥ जयाचे कारण तयासीच ठावे । पुसे त्याच्या भावे त्यास हरि ॥८॥ त्यांसी नारायण म्हणे राहा तळी । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥ वरी जाता हरि पाहाती सकळ । म्हणति गोपाळ आम्ही नेणो ॥१०॥ नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देईल शिव्या ॥११॥ आपुलिया काना देउनिया हात । सकळी निमित्य टाळियेले ॥१२॥ निमित्याकारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥ खांदीवरी पाव ठेवियेला देवे । पाडावा त्या भावे चेंडू तळी ॥१४॥ तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव कळों नेदी ॥१५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३६
नेदी कळो केल्याविण नेदी कळो केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणितले गडे सांभाळावें ॥२॥ सांभाळ करिता सकळा जीवांचा । गोपाळांसी वाचा म्हणे बरे ॥३॥ बरे विचारुनि करावे कारण । म्हणे नारायण ब-या बरे ॥४॥ बरे म्हणुनियां तयाकडे पाहे । सांडविला जाय चेंडू तळा ॥५॥ तयासवे उडी घातली अनंते । गोपाळ रडत येती घरा ॥६॥ येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरी सकळ आलि पुढे ॥७॥ पुसती ते मात तया गोपाळांसी । हरिदुःखे त्यांसी न बोलवे ॥८॥ न बोलवे हरि बुडलासे मुखे । कुटितील दुःखे ऊर माथे ॥९॥ मायबापे तुका म्हणे न देखती । तैसे दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३७
गोपाळां उभडु नावरे गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंठित हे वाचा झाली त्यांची ॥१॥ झाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हापासी देव होता ॥२॥ देवासवे दुःख न पवतें ऐसे । कांही अनारिसे दिसे आजि ॥३॥ आजि दिसे हरि फांकला यांपाशी । म्हणऊनि ऐशी परि झाली ॥४॥ जाणविल्याविण कैसे कळे त्यांसी । शहाणे तयांसी कळो आले ॥५॥ कळो आले तिहि स्फुंद शांत केला । ठायीचाच त्याला थोडा होता ॥६॥ होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शहाणा होता त्याने ॥७॥ सांगे आता हरि तुम्हा आम्हा नाही । बुडलासे डोहीं यमुनेच्या ॥८॥ यासी अवकाश नव्हेचि पुसता । झालिया अनंता कोण परि ॥९॥ परि त्या दुःखाची काय सांगो आता । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३८
पाषाण फुटती तें पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होते आम्हांपासी । बोलती एकासी एक एका ॥२॥ एकांचिये डोळा आसूं बाह्यात्कारी । नाहि ती अंतरी जळतील ॥३॥ जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिलीं लेकुरे कडियेहुनि ॥४॥ निवांतचि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥ त्यांचे जीवावरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळा वांचुनिया ॥६॥ वांचणें तें आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरिसवे ॥७॥ सवे घेउनिया चाललीं गोपाळा । अवघीच बाळा नर नारी ॥८॥ नर नारी नाहीं मनुष्याचे नांव । गोकुळ हे गांव सांडियेले ॥९॥ सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ॥१०॥ तिरी माना घालुनिया उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥ यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाईलीं कृष्णाचिया ॥१२॥ यांचे त्यांचे दुःख एक झाले तिरी । मग शोक करी मायबाप ॥१३॥ मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरीच तीर न पवतां ॥१४॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.३९
तीर देखोनियां तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठींचं कोल्हाळ करिताती ॥१॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागे ॥२॥ मागे सरे माय पाउलापाउलीं । आपलेंच घाली धाकें अंग ॥३॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरी हें हरि जाणवले ॥४॥ जाणवलें मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.४०
भावनेच्या मुळें भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोंटी ॥१॥ पोटी होतें मागें जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥ अंतरला बहू बोलतां वाउगें । अंतरिच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोणा भावें रडती तीं ॥५॥ तीं गेली घरासी आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥ मायबापांची तों ऐसी झाली गति । तुका म्हणे अंती कळो आलें ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.४१
आला त्यांचा भाव आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणांसाठीं होता ॥१॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥ आधीं पाठिमोरीं झालीं तीं सकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥ दिली हाक त्यानें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासी ॥४॥ भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधी ॥५॥ गर्व हरावया आला नारायण । मिस या करुन चेँडुवाचे ॥६॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

बाळक्रीडा अभंग क्र.४२
काळयाचे मागे चेंडु काळयाचे मागे चेंडु पत्‍नीपाशी । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥ उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदे वांकी नभा देखे पायी ॥३॥ पाहिला सकळ तिने न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥ विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥ दिसतसे रूप गोजिरे लहान । पाहाता लोचन सुखावले ॥६॥ पाहिले परतोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडे जाले आता ॥७॥ आता उठोनियां खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥ जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरिरूपे ॥९॥ रूपे अनंताची अनंत अपार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥धृ॥

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो