ग्रामगीता अध्याय 41

ग्रंथ-महिमा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥ 

यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥ 

ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर । सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥ 

ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥ 

ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥ 

चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ । करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥ 

म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां । वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया ॥७॥ 

परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करितां पारायणा । ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥ 

माझ्या मतें हें अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन । आधी शिकावें अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥ 

प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान । आपुलें वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥ 

असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली । नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ? ॥११॥ 

काय वाचतो याचें ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण । श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥ 

कोठे थांबावें वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि । कोठे रंगवावें गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥ 

ऐसें जंव कळलेंच नाही । केलीं पारायणें  सर्वहि । लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन ॥१४॥ 

वाचतांनाचि बोध होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो । कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥ 

ऐसें वाचन आधी शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें । मग आपणासि ओळखीत जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥ 

वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील । नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥ 

मुखाने ग्रंथ वाचावे । घरीं विपरीत आचरावें । तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥ 

मुखें वाचतो ’ सत्य बोलावें ’ । परि सत्य करणेंचि नाही ठावें । म्हणे ’ मज सत्यवान म्हणावें ’ । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥ 

मी तों धनावरचा सर्प बरवा । परि मला ’ उदार दाता ’ गौरवा । ऐसें कोण मानील आपुल्या गांवां ? सांगा सांगा ॥२०॥ 

रंजल्यासि न दे पाणी । म्हणे ’ मज म्हणा दानशूर राणी ’ । ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥ 

पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला । हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ’ व्यसनें सोडा ’ बोलतां ॥२२॥ 

एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला । परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने बाइलेसि ॥२३॥ 

ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति ! तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥ 

ऐसें न व्हावें आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी । आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥ 

उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल । श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि ॥२६॥ 

वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक । जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥ 

म्हणोनि हेंचि वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें । तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण ग्रामजीवनाचें ॥२८॥ 

येथे श्रोत्यांनी विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें । परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि फलदायी ॥२९॥ 

कोणी म्हणती ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्र, धन । होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या ॥३०॥ 

कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा । म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचतां ॥३१॥ 

कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा । मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥ 

कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी । याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ? ॥३३॥ 

याचें उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण । ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन दावूनि ॥३४॥ 

त्यांत एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं । त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥ 

कानीं पडो एकचि वचन । परि त्यांत असे महापुण्य । हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी ॥३६॥ 

नुसत्या पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व । कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥ 

कराया सांगितलें जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन । क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥ 

म्हणोनि मी या सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों । तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥ 

घोडयासि पाणी दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें । पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें ॥४०॥ 

ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले । कोण्या तोंडाने मागावें भलें । फळ तयांसि ? ॥४१॥ 

कांही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना । त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां हातामाजीं ॥४२॥ 

ग्रंथीं अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली । हजारो लोकांनी आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥ 

ग्रंथीं सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी । आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें ॥४४॥ 

कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति । घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥ 

व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती । नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥ 

कांही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी । सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥ 

लोकहि असती आसक्त बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे । धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥ 

फळ न लाभतां मग चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति । रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥ 

पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना । काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ? ॥५०॥ 

घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा । भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥ 

कलकत्त्याच्या गाडींत बसावें । आणि म्हणे ’ देवा ! पंढरीसि न्यावें ’ । ऐशा प्रार्थनेसि फळ यावें । कोण्या प्रकारें ? ॥५२॥ 

एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती । ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना ॥५३॥ 

शेवटीं पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला । तो पुसतो आपुल्या गुरुला । ’ साधन सांगा सुटण्याचें ’ ॥५४॥ 

गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी । शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी ॥५५॥ 

लावी देवीचें पुराण । करी नेटाने सत्यनारायण । आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तूं ॥५६॥ 

त्याने तैसेंचि सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले । बुवाब्राह्मणा धन उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥ 

शेवटीं पडला कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी । त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥ .

वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति । काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥ 

बिचारा चोरी करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना । काय करिती गुरु, ग्रंथ नाना ?  वाचणारा लबाड हा ॥६०॥ 

ऐसें जन्मभरि साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले । याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें साधन त्यांचें ॥६१॥ 

ऐसें कासयासि करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें । आपण बुडावें दुसर्‍या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥ 

सांगणाराने तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें । तेव्हाचि फळ अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥ 

हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना । हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥ 

हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून । जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें होतसे ॥६५॥ 

ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि । समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥ 

ही नव्हे फुलें टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि । आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही ग्रामगीता ॥६७॥ 

कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापें तापला । कोणी असहाय्यपणें संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥ 

कोणी अन्यायें लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी । देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें ॥६९॥ 

याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम । सुखशांति लाभेल करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥ 

अल्पबुध्दि जाईल विलया । वाचतां ज्ञान होईल तया । खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि ॥७१॥ 

प्रेम आजवरि होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें । सर्वांभूतीं दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥ 

द्वेषबुध्दीचें अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन । सत्कार्य कराया धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥ 

ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान । दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥ 

ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला । त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि ॥७५॥ 

सामुदायिक वाढली वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति । ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥ 

ग्रामगीतेंतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून । त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥ 

आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हातीं फडा । रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥ 

कार्यास लागतां तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं । चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ त्याचा ॥७९॥ 

एकांतीं बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां । जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥ 

ऐसें घर आदर्श झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें । मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥ 

हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला ! आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥ 

ग्रामगीतेचें फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि । उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता ॥८३॥ 

एक एक साधन वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां । केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥ 

ग्रामगीतेंतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना । ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥ 

नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति । समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥ 

सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था । साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि ॥८७॥ 

गायीगुरांची वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा । दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥ 

विवाहादि सर्व संस्कार । समाजीं होतील सुखकर । मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥ 

स्त्रिया-मुलें होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन । ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां ग्रामगीता ॥९०॥ 

भिकारी बेकारी गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा । सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥ 

आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण । अन्याय, व्यसनें, कारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥ 

गांवीं वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना । नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥ 

ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी । परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥ 

जी जी इच्छा कराल मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि । यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥ 

येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा । जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥ 

मी पंडित नोहे आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई । ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारें ॥९७॥ 

माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी । चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥ 

जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें । तैसेंचि दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥ 

म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो । या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥ 

भगवदगीतेचें हें सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप । अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥ 

गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला । राहूं नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥ 

मी तों केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं । म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥ 

श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली । परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥ 

ग्रामगीतेंत ज्यांचीं नांवें, चित्रण । त्या सर्व संतांचेंचि सहवरदान । ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥ 

ग्रामगीता माझें हृदय । त्यांत बसले सदगुरुराय । बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥ 

शब्दरचना गावंढळ । हें मी समजतों मनीं प्रांजळ । दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥ 

वालुकापात्रीं गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ । तैसें वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥ 

आमचें गांवचि मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले । ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥ 

घरोघरीं पंडित कुठले ? आहेत तेहि विकृत झाले । पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥ 

जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम । ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥ 

क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून । त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी अंत:करणें ॥११२॥ 

ऐसियांसीच पंडित मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें । त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥ 

धुंडाळूं नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि । आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥ 

जो ग्रंथहि प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो । वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती ॥११५॥ 

ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशींचा । तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥ 

पंडितांनी वाचूं नये । ऐसें माझें म्हणणें नोहे । परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥ 

पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन । समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥ 

ग्रामीं विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण । सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि ॥११९॥  

जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल । मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥ 

जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति । वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥ 

जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें । तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥ 

पाप म्हणजे बिघाड करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें । पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि ॥१२३॥ 

ऐसें नसावें वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें । तैसेंचि वर्ततां वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥ 

ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण । ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें वक्त्याने ॥१२५॥ 

ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य । प्रचार 

करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥ 

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ । घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥ .

ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता । प्रमाण द्यावें कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥ 

ज्याचे हातीं हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला । वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥ 

मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून । कळत नसतां घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥ 

उत्तम उपदेश हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला । तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥ 

प्रथम ऐकावें हें गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन । मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥ 

प्रथम श्रध्देने वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे । उठतां बसतां कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥ 

यांतचि माझें समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन । पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥ 

संपोनि जातील भेदवाद । नांदेल गांवीं प्रेम शुध्द । लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥ 

मानवांतील असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व । जीवनीं संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥ 

निसर्ग साह्य दे वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं । जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न सोडतां ॥१३७॥ 

आरोग्य होईल सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान । कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥ 

समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना । प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥ 

शोषण अथवा शासन । यांचें गळोनि पडेल बंधन । नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता ॥१४०॥ 

दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप । गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥ 

स्वर्गींचे अमर हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं । ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती वनांतरां ? ॥१४२॥ 

सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव । ऐसिया गांवा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥ 

त्यांच्या बोधें धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति । त्यांच्या प्रभावें शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥ .

ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति । देवचि गेला बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥ .

 

उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर । त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥ .

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥ 

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो