ग्रामगीता अध्याय 3

आश्रम धर्म

श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला। पाया धर्ममय ॥१॥ तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणें सर्वांला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥यांचें उत्तर आहे सोपें । जग चाले कोणाच्या प्रतापें ? आपुलेंच रडें आपणा न संपे । म्हणे जगाचें कैसे होय ? ॥३॥अरे ! तुम्हांस याची चिंता कशाला ? तें पाहूं द्या निर्मीत्याला । तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा । वृत्ति आठवे विषयचाळा । तरि सांभाळा गॄहधर्म ॥५॥चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमें सांभाळिले वीर्य । तरि याने का खुंटेल कार्य । संसाराचे ? ॥६॥मुलगा जरा वयांत आला । हवें तैसे वागूं लागला । बाळपणीच भोगी तारूण्याला । जन्म गेला दुःखीं मग ॥७॥ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर । यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥त्याचें जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप । त्यांचें संतान म्हणजे शाप । संसारासि ॥९॥संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा । यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा । म्हणोनि ब्रह्मचार्‍याने साधावा । गॄहस्थाश्रम ॥११॥ध्यानीं घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम । ज्याने व्यक्ति -गांव -राष्ट्र उत्तम । धारणेंत चाले ॥१२॥इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हातीं । पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावें या मार्गी ॥१३॥येरव्ही लग्न केलेंचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे । ऐसा आग्रह धरतील जे । ते व्यर्थवादी ॥१४॥जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण । त्याने केलेंचि पाहिजे लग्न । ऐसें नाही ॥१५॥परि संसार न करितां विरागी होय । त्यासि आहे महाभय । सेवासाधनाहि कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वतीं चढावें । आधंळ्याने युध्द करावें । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥हें साधणें सोपें नाही । तैसीच ही निसर्गाशीं लढाई । म्हणोनि त्याचा राजमार्ग तोहि । कथिला धर्मे ॥१८॥मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । शक्तियुक्तींनी उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥घडलें निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरीं प्रगटलें ओजवीर्य । निसर्गेचि झालें अनिवार्य । लग्न करणें ॥२०॥न जाणों लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार । म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर । करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥गृहस्थाचा काय धर्म । कोणतें आचरण काय वर्म । कैसें आचरावें कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी । पत्नी येंता आपुल्या घरी । घरचि लागे साधावें ॥२४॥मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर । म्हणोनि सावध – सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा । धर्म साधावा कुटुंब -राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपें विकास केला । तेणें घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥कैसे घडेल उद्योग करणें । आपुला सर्वांचा निर्वाह साधणें । लग्नसंस्कारें लाविली बंधनें । समाजधर्माचीं ॥२८॥एकपत्नीव्रता घ्यावें । वाईट कुणाकडे न बघावें । हेंच निश्चयाने शिकवावें । लागे तया ॥२९॥काहीं घडतां दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर । म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥याच कारणासि जपावें । सात्विक मार्गां अवलंबावें । संती सांगितले जें बरवें । तेंचि करावें सर्वथा ॥३१॥एकांतीं लोकांती स्त्री पाहोन । होऊं न द्यावें वृत्तीचें उत्थान । प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोंवू नये कुमार्गीं ॥३२॥एका पत्नीसि शास्त्रें नेमिलें । ऐशा गृहस्थाश्रमीं राहिलें । तरी तो ब्रह्मचारीच म्हणविलें । पाहिजे आम्हीं ॥३३॥गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयीं वागला । तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥त्यासाठीं उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समागम । येरव्ही आपले व्रतनियम । दोघांनीहि आचरावें ॥३५॥संतानाकरितांच वीर्य देणे । येरव्ही आपुलें ब्रीद रक्षिणें । ऐसें साधलें जीवन ज्याने । महान तपस्वी ॥३६॥अहो ! लग्न जरी केलें । तरी विषय -दास्य नाही सांगितलें । जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥जिंकावया कामवृत्ति । पत्नी , नव्हे वाढवाया ती । उत्तममार्गे मिळवावी संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥जीवन -शक्ति एक झाली । तेणें सुकीर्ति प्रकाश पावली । सतकार्य -कळी उमलों लागली । ऐसें व्हावें ॥३९॥सुख व्हावें मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरांसि । वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वांना ॥४०॥मोकळें बोलणें गोजिरवाणें । चाल चालणें चारित्र्याने । जीवन कंठणे उज्ज्वलतेने । थोरामोठयांचें पाहूनि ॥४१॥संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचें करणें अध्ययन । यानेच फिटेल ॠषिॠण ।गृहस्थाचें ॥४२॥संतान करावें आदर्श साचें । तरि ॠण फिटे मातापित्याचें । अथवा आपणचि नाम वाढवावें तयांचें । देशसेवेने ॥४३॥विश्वीं देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा । प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वांचें जीवन । संतोषवावे दीन दुःखी जन । सेवाभावें ॥४५॥उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा , ग्रामसेवा । ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वांसि ॥४६॥गृहस्थाश्रमीं ऐसें वर्तलें । अतिमहत्त्व जीवना आलें । साधुसंती गौरविलें । ऐशा गृहस्थाश्रम ॥४७॥असो कोणताहि आश्रम । त्यांत मुख्य असे संयम । विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचें पारणें फिटलें । पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश । सुख व्हावें पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास । दुसर्‍याच्या सुखार्थ भोगी त्रास । हें शिक्षण गृहधर्मी ॥५१॥त्याच्या गुणात आपुलें भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान । तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावें लागे त्यासाठी कष्टी । प्रसंग पडतां उठाउठी । धांवूनि झेली स्वतःवरि ॥५३॥परि आपुल्या पुत्राकारणें । कोणावरि अन्याय न करणें । आपुल्या ऐसींच समजणें । मुलें सर्वांचीं ॥५४॥सर्वांकरितांच झटावें । ऐसें व्यापकपण साधावें। हेंच गृहस्थाश्रमीं शिकावें । लागे तत्व ॥५५॥पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि । पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला । तिसरा होतांचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥न संपतां मग यातना । भोगाव्या लागताति नाना । वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारें ॥५८॥ऐसें जयाने साधलें । त्यासीच ’पुरूष ’ म्हणणें शोभलें । येरव्ही ते विषयी झाले । गधे घोडे वानर ॥५९॥मीं तों ऐसें नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले । त्यास साठ पुत्र झाले । ते राहिले शेतावरि ॥६०॥एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी । लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । सगळया आयुष्याची दुर्दशा । वासनेपायीं ॥६२॥काहीं दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वांचे नागविती । ही तों आहे पशुवृत्ति । गृहस्थाश्रम म्हणों नये ॥६३॥पुरुषा बहुपत्नींचा अधिकार । स्त्रियांनी कां न करावे चार ? हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति । त्या माऊलीची कोण गति । देव जाणे ॥६५॥हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा । म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली । तरीच दोघांनाहि लाभली । शांति संसारी ॥६७॥संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान । ऐसी गाठीं बांधोनि खूण । विचारें सुख साधावें ॥६८॥दोघांचें व्हावें एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण । होतां आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥यावरि श्रोतीं विचारलें । संतानासाठी लग्न नेमिलें । परि एका स्त्रियेसि संतान न झालें । म्हणूनि केलें दुजें लग्न ॥७०॥त्यासि निषधिलें आपण । आता सांगा न होतां संतान । कैसें फिटूं शकेल ऋण । देशाचें आणि वडिलांचें ? ॥७१॥लग्न केलियाहि वरि । पुत्र न होतां उदरीं । म्हणती त्यास अधोगति सारी । प्राप्त होते ॥७२॥याचें उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा । सेवेने ज्ञानाने मुक्तिसुखां । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥पुत्र न होतांचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक । तरले ऋषिमुनि संत देख । बुडालीं अनेक श्वानसूकरें ॥७४॥’ निपुत्रिकास अधोगति ’ । ऐसें जे ग्रंथवेत्ते म्हणती । त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥भारतीं ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला । महत्त्व न द्यावें लग्नकार्याला । ऐसें झाले ॥७६॥ज्यानें त्याने तप करावें । ऐसें धरलें बहुतांच्या जीवें । म्हणोनि हें बंधन घालावें । लागलें ग्रंथकर्त्यां ॥७७॥पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी । ऐसेंहि बोलिलें निर्धारी । ग्रंथामाजीं ॥७८॥यांतूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार । पुत्र नसतांहि होतो उध्दार । प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥समाजाच्या उनत्तीचें सुत्र । खंडूं न द्यावें सर्वत्र । यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥’ पापपुण्य आपुलें आपणा । पुत्रबंधु न तारी कोणा । ’ ही ग्रंथांची सत्य घोषणा । विसरूं नये कोणीहि ॥८१॥एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला । सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥असेल मुलासाठी धन । करावें सत्कार्यासि अर्पण । यांत भावना ठेवूं नये भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥आपुलें घरचि नव्हे घर । विश्व आपुलें मकान सूंदर । हेंचि शिकावया असे संसार । उध्दार तो याच मार्गे ॥८४॥ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुलें शोधोनि अंतर । दूरदृष्टीचा साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥मन काढावें घरांतूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि । पुत्र नसतां गावांस अर्पूनि । देशाटनीं निघावें ॥८६॥निघावें पत्नीस घेऊनि। जी धर्मअर्थकामीं सांगातिणी । ती जरि साथ न दे मोक्षसाधनीं । पुत्राजवळी राहूं द्यावें ॥८७॥पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनीं वर्जावा भोग । दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥कार्य संपले संसाराचें । पुढील जीवन वानप्रस्थाचें । मिळोनी तपाचे सदवर्तनाचे । धडे पाळावे दोघांनी ॥८९॥पाहावीं विशाल स्थानें मंदिरें । तीर्थें वनें मुनि -कुटीरें । अनासक्त व्हावया मनें शरीरें । चित्त लावावें सत्कार्यीं ॥९०॥सर्वकार्यासि वाहून घ्यावें । अध्यात्मभावा अनुभवीत जावें । आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गांवाची अवदशा । काम करावें भरूनि हर्षा । सर्वांसाठी अंतरी ॥९२॥शिक्षणसंस्था , आश्रमसंस्था । सत्संगसंस्था परमार्थसंस्था । यांची करावी सर्व व्यवस्था । शांतीसाठी ॥९३॥अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगीं । आश्रम चालवावे जागजागीं । त्यांच्या सेवेचे ॥९४॥गृहस्थांना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थें लक्ष द्यावें । मुलाबाळांसि संगोपावें । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥द्यावें जीवनाचें शिक्षण । जेणें कार्यकर्ते निघतील पूर्ण । सर्वांगीण उन्न्तीचें ज्ञान । द्यावें तयां आश्रमस्थानीं ॥९६॥हें कार्य वानप्रस्थाने करावें । घरादारांचे बंध तोडावे । अनासक्तीने वागावें । सेवेसाठी सर्वांच्या ॥९७॥नुरतां संसारात वासना । वैराग्य येतें सहज वर्तनां । उरले तें हेचि कार्य जाणा । शिक्षण द्यावें सर्वांसि ॥९८॥ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा । हेंचि अनुभवावया जीवभावा । वानप्रस्थ आश्रम ॥९९॥तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम । व्हावया वासनेचा उपशम । अंतरामाजीं ॥१००॥पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम । अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥जेव्हां घरांतूनि मन निघालें । सर्वदेशी होऊनि सेवे लागलें । संन्यासवृत्तीने क्रमें साधलें । परमात्म्य अंगी ॥१०२॥संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटीं स्थितप्रज्ञता कैसी । प्राण गेल्याहि आसक्क्तीसि । स्पर्श मुळी होईना ॥१०३॥वानप्रस्थीं संसार त्यागला । संन्यस्तीं स्वरूपं योग झाला । परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ । प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजीं ॥१०५॥ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली । याचि देहीं त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥तो सकळां झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक । जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥हेंचि सत्य -धर्माचें ध्येय । हेंचि सर्व कर्मांचें श्रेय । सर्व ग्रंथाचें हेंचि तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत । तिन्ही आश्रम निरूपिले येथ । तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
अभंग
आमची माळियाची जात ।शेत लावूं बागाईत ॥आम्हा हातीं मोट -नाडा ।पाणी जातें फूलझाडां ॥शांति -शेवंती फुलली ।प्रेम -जाईजुई व्याली ॥सांवताने केला मळा ।विठ्ठल देखियला डोळां ॥— श्रीसंत सांवता महाराज