ग्रामगीता अध्याय 15

गोवंश – सुधार

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥ 

दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥

कोठे गायी राहिल्या आता ? तुरळक दिसती विकतां वाचतां । वधती चपलाजोडयांकरिता । वासरेंहि करोडो ॥३॥ 

गोपालांचा देश भारत । आला गायीगुरें पूजीत । परंतु गायी झाल्या खात । लक्षचि नाही तयांकडे ॥४॥

त्यांतील कांही कसाब घेती । कांही दुसरीकडे नेती । उरल्या त्या कचरा असती । गायी सार्‍या ॥५॥ 

चारापाणी अति महाग । नाही व्यवस्थेसाठी मार्ग । मानवचि अर्धपोटी, मग । गायी कैशा पाळाव्या ? ॥६॥

ऐकोनि त्याचें विशद विवरण । म्हणालों तुमचें म्हणणें मान्य । परि यांत आपुलाचि संपूर्ण । दोष आहे ॥७॥ 

भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥८॥ 

म्हणोनि गोवंश सुखी होता । तोंवरि नव्हती दरिद्रता । नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥९॥ 

गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । पेवें भरती गांवागांवास । धान्याचीं तेव्हा ॥१०॥

भूमि आणि जनावरें । हींच उत्पत्तीचीं कोठारें । एकाचीं अनेक होतीं खिल्लारें । जोडधंदा हा घरोघरीं ॥११॥ 

घरोघरीं दूधदुभतें । अन्नधान्यासि सहायक तें । आबालवृध्द राहत होते । सशक्त आणि निरोगी ॥१२॥ 

म्हणोनि गायीगुरां ’ गोधन ’ । ऐसें सत्य नामाभिधान । सुखी होता भारत संपूर्ण । गोवंशा सुखवोनिया ॥१३॥ 

परि पुढे झालें दुर्लक्ष । कांही भोवला राज्यपक्ष । गायी होऊनि बसल्या भक्ष्य । वाढलें दुर्भिक्ष त्यागुणें ॥१४॥ 

आपण दुधाळ म्हशीकडे गेलों । चहाकॉफी आदि पिऊं लागलों । म्हणोनि गायीसमेत मुकलों । सर्वस्वासि ॥१५॥

प्राणी खावोन एकदा तोषला । तो नित्यासाठी त्यास मुकला । मग कुठलें दुभतें, संतान, खतादि त्याला ? ऐसें केलें वेडयापरी ॥१६॥ 

गायी विकोनि पोट भरलें । मग नित्यासाठी खाईल कुठलें ? पोट बांधोनि गायीस पोषिलें । त्यासि लाभलें सौख्य पुढे ॥१७॥

’ गोरक्षणीं स्वरक्षण ’ । ऐसें पूर्वजांचें कथन । म्हणोनीच गायींकरितां प्राण । दिले अनेक शूरांनी ॥१८॥

श्रीकृष्ण आणि शिवशंकर । वसिष्ठ आणि दत्तदिगंबर । दिलीप, शिवाजी गोसेवा-तत्पर । संत अपार गोभक्त ॥१९॥

ज्यांनी त्यागिलें सर्वस्वास । करतलीं भिक्षा तरुतलीं वास । ऐसे निष्काम गुरुहि गोसेवेस । न विसंबती कदापि ॥२०॥

गायीच्या शरीरांत सर्व । कल्पिले जे देवीदेव । तयांचा हाचि असे भाव । गाय अधिष्ठान देशाचें ॥२१॥ 

तिच्या शेणाने पिके शेती । शेती देई सुखसंपत्ति । म्हणोनिच शेणामाजी लक्ष्मीची वसती । वर्णिली असे ॥२२॥ 

गोरसाने आरोग्य शरीरीं । मग कोठे राहिला धन्वंतरी ? सत्वांश मिळतां बुध्दि गोजिरी । सरस्वती ही गोदुग्धीं ॥२३॥ 

उदररोगांचें नाशक । सत्वांश देई गायीचें ताक । तुपाने शांत डोळे मस्तक । चंद्रसूर्य जणूं नेत्रीं ॥२४॥

गाय जिवंत आरोग्यधाम । तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम । राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम । गोसेवेयोगें ॥२५॥म्हणोनि सकलांचें कर्तव्य आहे । जेणें गोवंश सुधारणा होय । ऐसा करावा कांही उपाय । सर्वतोपरीं ॥२६॥

कसाब आपुल्या गांवांतूनि । गायी नेती बघतां नयनीं । दु:ख व्हावें सकलांच्या मनीं । परतवाव्या त्या गायी ॥२७॥

ऐसे दलाल हाकोनि द्यावे । अथवा अन्य कामीं लावावे । परोपरीने सुमार्गी वळवावे । घेते-देते सर्वचि ॥२८॥ 

विकणारासि समजावावें । एवढयाने का श्रीमंती पावे ? मरे तों घरीं खतमूत घ्यावें । तरी फळे सेवा गायीची ॥२९॥

द्वारीं सकाळीं गाय हंबरली । गोमूत्र देवोनिया उठली । म्हणजे समजावी पवित्रता झाली । जागेमाजी ॥३०॥ 

ज्याचे घरीं शेती आहे । त्याने अवश्यचि पाळावी गाय । मळमूत्र सर्व उपयोगी राहे । ऐसी गाय माऊली ती ॥३१॥

गाय माऊली आईसमान । तिची निगा असावी पूर्ण । न करावी गोमाशांची खाण । अथवा सांपळा हाडांचा ॥३२॥

घालोनि चारा पेंड चुरी । गाय करावी हत्तीपरी । प्रेमें गोंजारोनि घरोघरीं । गाय प्रसन्न ठेवावी ॥३३॥ 

गांवीं असावा आदर्श सांड । बैल निपजावया धिप्पाड । सुंदर होईल शेतीसि जोड । वाहावया बैलांची ॥३४॥

उत्तम गायी सुंदर सांड । पाहतां आनंद वाटे उदंड । दूध पिवोनि मुलें प्रचंड । शक्ति दाविती ॥३५॥ 

तेंचि खरें सात्विक सौंदर्य । मुलें गोंजारिती वत्स गाय । दूध पूवोनि राहती तन्मय । खेळींमेळीं ॥३६॥

गोवंशाचें दूध वाढे । तरीच संतान उन्नतीस चढे । खाऊं घालोनि लाडू पेढें । उगीच पोटें वाढती ॥३७॥

कृत्रिम दूध-लोणी कांही । गोरसतुल्य ठरणार नाही । नाना रोग वाढती देहीं । न कळतां कृत्रिमतेने ॥३८॥ 

सर्वथैव यंत्रांनीच कांही । शेती सुखकर होणार नाही । गांवची संपत्ति गांवीं राही । सुगम तो मार्ग उत्तम ॥३९॥

यासाठी गायीगुरांची जोपासना । घरोघरीं ठेवावा गोवत्सठाणा । प्रसन्न दिसावे पशू नाना । उत्तम लाभावें दूधदही ॥४०॥ 

दुधादह्याची योग्य पूर्ति । व्हावी आपुल्या गांवाप्रति । घरोघरीं गायीवासरें असती । तेंचि गांव भाग्यशाली ॥४१॥

जो आपुल्या घरीं गाय न ठेवी । तयासाठी गोरक्षणें असावीं । गरीबांची तेथे सोय व्हावी । उत्तम लाभावा गोरस ॥४२॥

कांही ठिकाणीं गोरक्षणें करिती । मरतुकडया गायी जमविती । त्यांच्या नांवाने पैसे खाती । गायी मारती उपवासी ॥४३॥ 

ऐसें नको गोरक्षण । जें दुखवी मानवी मन । राहावी गायी-सांड पाहोन । प्रसन्न जनता सर्वदा ॥४४॥ 

गोरक्षणें दहीदुधाची सोय व्हावी । लोकीं सुखसंपन्नता यावी । कोरडी गोपूजाच न करावी । घरोघरीं अथवा गांवीं ॥४५॥

उत्तम चारापेंड देऊन । वाढवावें गायींचें वजन । आदर्श गायी वळू ठेवोन । उत्तम गोधन वाढवावें ॥४६॥

गांवीं सुंदर गायींचा तांडा । चराया गोचरभूमि उदंडा । नदी तळें विहिरीचा आखाडा । भव्य जैसा ॥४७॥ 

उत्तम ऐसा देवसांड । मुबलक चरावा चारा-बिवड । बीजारोपणीं दूधकावड । देती गायी ॥४८॥हेंचि खरें गोरक्षण । नाहीतरि कसाबभुवन । उगीच गायी वाडयांत कोंडून । गोरक्षण का होई ? ॥४९॥

गायीस नसे चराऊ जमीन । तरि मोकळी पाडावी सरकाराकडोन । अथवा गांवीं करावी अर्पण । जमीनदारांनी ॥५०॥ 

गोरक्षणाचा व्हावा अभ्यास । नाना प्रयोग सावकाश । कैसे पुढे गेले अन्य देश । ती माहिती द्यावी सर्वां ॥५१॥ 

गोवंशाच्या रोगनिवारणा । गांवीं ठेवावा दवाखाना । लाभ मिळावा सर्वांना । प्रतिबंधकता समजावी ॥५२॥

गांवोगांवीं व्हावी गो-उपासना । गोसेवा गोदुग्धमंदिर स्थापना । रुचि लावावी थोरांलहानां । गोदुग्धाची परोपरीं ॥५३॥

सर्व करावें जें जें करणें । परि सुधारावें सात्विक खाणें । त्यावांचोनि सदबुध्दि येणें । कठिणचि वाटे ॥५४॥ 

सात्विक खाद्यपेयांविण कांही । गांवीं आरोग्य येणार नाही । उत्तम शक्ति नसतां देहीं । संपत्तिहि कैची ? ॥५५॥ 

उत्तम दूध उत्तम सांड । उत्तम शेती उत्तम बिवड । उत्तम कामगार प्रचंड । शक्तिशाली ॥५६॥ 

ऐसें ज्यांनी गांव केलें । तेचि आज प्रतिष्ठा पावले । एरव्ही तोरा करोनि मेले । निकामी ते ॥५७॥ 

निकामियाची व्यर्थ संपत्ति । निकामियाची व्यर्थ शक्ति । नाना मार्गे संपोनि अंतीं । दु:ख देई जीवासि ॥५८॥

खूप सत्वमय खावोनि अन्न । मेद घेतला वाढवोन । तेथे रोगांची फौज निर्माण । होतसे दु:ख द्यावया ॥५९॥

म्हणोनि केलें पाहिजे काम । आरोग्यदायी कुणी व्यायाम । अंगांतोनि निघतां घाम । नष्ट होती रोगजंतु ॥६०॥

व्यायाम आरोग्यदायी मित्र । हें ध्यानीं ठेवावें सूत्र । आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरीं ॥६१॥

व्यायामाविण सात्विक भोजन । तेंहि मारी विकारी होऊन । व्यायामें होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ॥६२॥ 

व्यायामें जडत्व जाई दुरी । व्यायामें अंगीं राहे तरतरी । रक्तव्यवस्था उत्तम शरीरीं । वाढे विचारीं सजीवपण ॥६३॥

व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामें मानव होय दीर्घायु । व्यायामहीना पित्त कफ वायु । जर्जर करिती अत्यंत ॥६४॥ 

व्यायामें वाढे प्रतिकारशक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति । व्यायामें अंगीं वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ॥६५॥ 

ऐसा व्यायाम सर्वांकरितां । असे उपयुक्त पाहतां । ही नव्हे केवळ एकांगी संथा । पहिलवानांची ॥६६॥ 

कोणी व्यायामामागेच लागले । ते मल्ल-पहिलवान झाले । लोकां दिपवोनि सामर्थ्य दाविलें । देह-शक्तीचें ॥६७॥

त्यांत कोणी बक्षिसासाठी । करिती जीवनाची आटाआटी । पैशांसाठीं मारापिटी । करिती कोणी ॥६८

देह झिजवावा सेवेस्तव । सत्यमार्गे रक्षावें गांव । दुर्बळासि उचलावें हेंचि वैभव । मल्लविद्येचें ॥६९॥ 

परि इकडे नाही ध्यान । नष्ट करोनिया मिष्टान्न । शक्ति खर्चिती दुष्कर्मी पूर्ण । ऐसे व्यायामी कितीतरी ॥७०॥

कोणाच्या भरदार देहावरि । कपडे मुलायम जरतारी । आपुल्याच खाद्य खुराकीची करी । सर्वदा चिंता ॥७१॥ 

गांवसेवेचें काम आलें । तेथे पुढारीपण दिलें । तरि तोंडचि त्याचें चाले । स्वयें न करी एकहि ॥७२॥ 

कपडयास न पडावी वळी । म्हणोनि दुरुनीच सांभाळी । कामें करिती माणसें सगळी । परि तो जागचा हालेना ॥७३॥

असेल कुस्तीमाजी बरवा । परि जो प्रसंगीं कामीं न यावा । तो मल्ल म्हणोनि गौरवावा । कोणत्या न्यायें ? ॥७४॥

तोचि खरा पहिलवान । जो देह-उन्नति साधूनि पूर्ण । सेवेसाठी अर्पितो जीवन । हनुमंतापरी ॥७५॥

नुसतें दंडमोंढे मारणें । कुस्ती जिंकणें, चणे पचविणें । थोरालहानांस तंबी देणें । नव्हती लक्षणें व्यायामाचीं ॥७६॥

साधाया सेवेचा उपक्रम । कराया जीवनाचें काम । जो शक्ति दे तोच व्यायाम । आवश्यक सर्वां ॥७७॥ 

व्यायाममंदिरांतचि कांही । व्यायाम होतो ऐसें नाही । उत्पादनासि सहायक होई । तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा ॥७८॥

हाते घेवोनि दंड मारणें । त्याहूनि उत्तम पाणी ओढणें । दळणें, फोडणें, जमीन खोदणें । आरोग्यदायी ॥७९॥

जीवनाचा अमोल वेळ । घालवोनि खेळती तकलादी खेळ । त्यापेक्षा परिश्रमाचें फळ । उत्तम सर्वतोपरीं ॥८०॥ 

दळणकांडणादिकें उत्तम । मिळे आरोग्यकारी व्यायाम । देह विशेष राही कार्यक्षम । ऐसा सत्वांशहि लाभे ॥८१॥

वाचेल बरीचशीं संपत्ति । देशांत वाढेल श्रमाची  शक्ति । सर्व कार्यांचीं होईल पूर्ति । गांवींच या मार्गाने ॥८२॥ 

होवोनिया लोकसेवा । आरोग्याचा लाभेल मेवा । गांवास लाभे सुखाचा ठेवा । अडचण कोठे कशाची ? ॥८३॥ 

आपुली शेती आपुल्या कष्टें । शेणमूत्रादि घालोनि गोमटे । करिता ऐसी आदर्श नेटे । उत्पन्नासी वाण नुरे ॥८४॥ 

आबालवृध्द नरनारी । यासाठी झटतील घरोघरीं । तरि सर्व सुखें संसारीं । लाभतील त्यांना ॥८५॥

लाभेल व्यायामाचें फळ कामामाजींच सकळ । निसर्गचि देईल आरोग्यबळ । सर्व लोकां ॥८६॥

वनस्पति आदींचा सहवास । सूर्यकिरणांतील सत्वांश । शुध्द हवेंतील श्रम सर्वांस । अमृतापरी लाभदायी ॥८७॥ 

मग गांव असो की शहर । तेथे रोगांचा न राहे संचार । एक-एक व्यक्ति करील आचार । ऐसा जरी ॥८८॥ 

व्यसनें आळस दुराचार । यांपासोनि राहिला दूर । ऐसा एकेक घटक सुंदर । पाहिजे गांवीं ॥८९॥ 

सदगुण जेथे जेथे दिसती । ते उचलोनि आणावे अनुभवाप्रति । यानेच उन्नत होईल व्यक्ति । जीवन सुधारेल गांवाचें ॥९०॥

जीवन लाभावें उज्जवलतेचें । तरि सर्व कामधाम असावें सोयीचें । जें जें कराल तें चालावें साचें । त्याच मार्गी ॥९१॥

भोजनस्थानीं निद्रास्थानीं । सभास्थानीं उधोगस्थानीं । विशेष प्रसंगीं सहजस्थानीं । सदविचारेंचि वर्तावें ॥९२॥

संस्कार आणि शुध्दबुध्दता । आरोग्य आणि पवित्रता । यांवरि लक्ष ठेवोनि सात्विकता । बिंबवावी जीवनीं ॥९३॥

यांकरितां बोललों कांही दिनचर्या । आहारविहारादि कार्या । ग्रामस्थांनी अनुभवोनिया । उध्दार करावा जीवनाचा ॥९४॥

ऐसें करावें एकेक कार्य । जेणें गांवीं नांदेल सात्विक सौंदर्य । यांतचि स्वर्गीय सुखाचें माधुर्य । तुकडया म्हणे ॥९५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । गोरसव्यायामसेवन कथित । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥९६॥ 

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

अभंग

देवा ! दुधाची शिदोरी । 

कां मज न देसी श्रीहरि ! 

आळ पुरवी बा मुरारी ! 

दूध पोटभरी मज देई ॥ 

माता पिता उपमन्य । 

तिघे गरुडपृष्ठीं वाहवून । 

क्षीरसागरीं ठेवी नेऊन । 

दूध प्राशन सुखें करा ॥ 

–श्रीसंत नामदेव महाराज

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो