ग्रामगीता अध्याय 12

ग्राम शुध्दी

॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥

एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥

कागदीं पुस्तकांत, काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥

रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें । एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥३॥

’ खेडयाकडे चला ’ म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां । घरें कसलीं ? हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥ 

नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून । उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ? ॥५॥

मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें पटलें । त्याचें कारण तेंहि ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥६॥

जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी । तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गांवशिवेच्या ॥७॥ 

एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें । त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ? ॥८॥.

कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा । सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥ 

वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर । पूर्वी ज्यांना

 ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या हातूनिया ॥१०॥

चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना । जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥११॥

कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले । कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥१२॥

कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली । माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्‍याच्या ॥१३॥

कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले । रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥१४॥ 

कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच निघालीं । मार्गस्थांची फजीती झाली । सांगतां येना ॥१५॥

कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें । कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥

कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना । बोचती येणार्‍या-जाणार्‍यांना । बोलूंच नका ॥१७॥

साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि । गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥

सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले । आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥

गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले । ठायींठायीं उकिरडे साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥२०॥ 

घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले । फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥२१॥

गांवीं खंडार्‍यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन । पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥२२॥

विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या । घुणार्‍या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यांत पाचोळा ॥२३॥ 

कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्‍या उपसोनि ओंगळ । टाकोले हीर, फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥ 

श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे । मार्गीच लाकडें विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥ 

गांवातील पंच झोपले । ” काय म्हणावें ? नातलग मित्र आपलें ! ” म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥२६॥ 

ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति । म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति ।गांवोगांवीं आतातरी ॥२७॥ 

हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या । आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥ 

जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले । ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥२९॥

भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार । झाडीत होते गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥ 

पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकांचा जाणोनि ओघ । देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥

नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा । तीहि गेली लयाला आता । उरलें सगळें करंटेपण ॥३२॥ 

दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव, दहीकाल्याच्या  प्रसंगें । त्यांतहि शिरलें बेढंगें । नाचगाणें, दंढारी ॥३३॥

लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचें तत्त्वचि आतां न जाणती । म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारीं घरोघरीं ॥३४॥

कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन । तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामांतूनि ॥३५॥ 

मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें । 

कसेंतरी लाविती, साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥ 

कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे । बेताल होतां कोठूनि भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥३७॥ 

ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें, सभा । म्हणती ’ दयायावी रुक्मिणीवल्लभा ’ । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥

गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे । कसली भावना ? खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥

चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई । कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥४०॥

कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा । याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥४१॥

नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त । माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥

मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा । रेटा बसे मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥

सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना । मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ? ॥४४॥ 

म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गांवाचें पुनर्निर्माण । सेवामंडळ संस्थेंतून । उदय केला कार्याचा ॥४५॥ 

मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची । प्रदक्षिणेंत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥ 

मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र । त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गांवीं ॥४७॥ 

जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें । सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें ॥४८॥

आपण तेवढें स्वच्छ राहावें । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावें । याने सुमंगलता कधी न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥

म्हणोनि स्वच्छ ठेवावें दुकानघर । नाल्यामोर्‍या सडका चौफेर । मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥

रामधूनपूर्वी गांव पूर्ण । व्हावें स्वच्छ सौंदर्यवान । कोणहि घरीं गलिच्छपण । न दिसावें कोठे ॥५१॥

त्यांत व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात । ज्यांना सेवा हेंचि व्रत । पसंत आहे ॥५२॥ 

मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं । हस्तेंपरहस्तें साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥ 

त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून । अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥ 

त्यासाठी करावे खतखड्डे । गांवाबाहेर जागीं उजडे । जनावरांचें मलमूत्र सापडे । तेंहि त्यांतहि भरावें ॥५५॥

तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोंचि न द्यावा कोणास । आपुल्या मळाची आपणांस । व्यवस्था लावणें सोयीचें ॥५६॥

नदीकिनारीं वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त । ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥

तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश । मलमूत्र येवोनि खतरूपास । कारणीं लागो म्हणोनिया ॥५८॥ 

सर्व गांवाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती । त्यांवरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया ॥५९॥ 

एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी । ते खतद्रव्यांची करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥ 

अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना । खाद्यचि होतें खत जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥

आपण जें जें कांही खातों । रसरक्तमांस तेणें जमवितों । त्यांतूनि वाचलें तें खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥

त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना । खत नसतां भूमिची दैना । होऊं लागे ॥६३॥ 

मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली । पुन्हा पेरणी करितां उदभवलीं । प्रचंड कणसें ॥६४॥ 

परि गांव हें समजेना । याचें ज्ञानचि नुरलें कोणा । करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥

गोवर्‍या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती । शेणांत आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथींहि वचन ऐसें ॥६६॥

म्हणोनि सर्व गांवाचें मलमूत्र । जमवोनि झाकावें जाणोनि तंत्र । त्याने गांवाची जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥ 

याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचें नुकसान । आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥

हें समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी । जनता जागृत करोनि शेवटीं । उत्पन्न द्यावें वाढवोनि ॥६९॥

गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा । त्यांचेंहि खत कराया सर्वांना । लावोनि पीक वाढवावें ॥७०॥

मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणीं । मुबलक उत्पन्न गगनासि भेदूनि । दिसावें गांवीं ॥७१॥ 

हेचि खरी आहे सेवा । हेंचि आवडे देवाधिदेवा । उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ? ॥७२॥ 

सर्वांनी गांव स्वच्छ करावें । तेणें आरोग्य नांदेल बरवें । घाण-खतांतूनि नवनवें । वैभव येईल उदयासि ॥७३॥

ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरीं । स्वच्छतेसवेंच पावित्र्यहि भारी । वातावरणीं यावयासि ॥७४॥ 



प्रात:काळीं सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर । त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥

यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून ? जेणें घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेंहि संपादे ॥७६॥ 

रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती । जेणें स्नान घडे गांवाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥ 

निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावें सडासंमार्जन । सर्व गांवाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावें ॥७८॥

जिकडे तिकडे पाणी शिंपावें । मार्ग रांगोळयांनी सजवावे । ठायीं ठायीं ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥

सुंदर बांधावें आम्रतोरण । ठिकठिकाणीं शोभवावें मैदान । आपुलाल्या श्रमाचें प्रदर्शन । दारादारांत ठेवावें ॥८०॥

मग जमोनि सकल सेवकजनें । रामधून काढावी गांभीर्याने । प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥

लहान मुलें मुलांमाजी । तरुण युवक तरुणांमाजी । वयोवृध्द सहजासहजीं । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥ 

स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गीं आणावी शोभा चांगली । गीतें म्हणणारांची योजना केली । पाहिजे मधामधांतूनि ॥८३॥

बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण । त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥

एकाने धरावी घंटा हातीं । दोन ठोके द्यावेत घाटेवरती । चालू लागेल ठरलिया पध्दतीं । रामधून जागेहूनि ॥८५॥

’ रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम । ’ म्हणावें गायकाने प्रथम । मग म्हणावें सर्वांनी ॥८६॥



अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी । मग गीतें गायकांनी म्हणावीं । राष्ट्र-भक्ति-भावनेचीं ॥८७॥

कांही म्हणावीं ग्रामावर । कांही म्हणावीं भक्तिपर । कांही म्हणावीं निरंतर । चारित्र्यवान करणारीं ॥८८॥

चौकांतूनि दारांतूनि । जात असतां शांतपणीं । जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारें ॥८९॥

गुरुदेवाच्या जयजयकारें । भारतमातेच्या नामोच्चारें । साधुसंतांच्या घोषें उदगारें । जागृति करावी आनंदें ॥९०॥ 

मार्गी थोरामोठयांचें चित्रदर्शन । वंदावें उभ्यानेचि हात जोडोन । थांबूं नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥

ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकीं स्थिरावोनि घ्यावी । आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकांपुढे येवोनि ॥९२॥ 

मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळींत बरवे । लहान लहानांत ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥

महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग । ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानीं ॥९४॥

मग सूचकाने सूचना द्यावी । जीं ’ सक्रियपाठीं ’ लिहिली बरवी । प्रार्थना, भाषण, प्रणाम योजावीं । योजनेपरी ॥९५॥

भाषणीं हेंच सांगत जावें । जनतेने नीटनेटकें राहावें । सहकार्याने वागत असावें । गांवामाजी ॥९६॥

जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन । तयायोगें विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥

सर्वांनी स्वच्छ शिस्तबध्द व्हावें । परस्परांशीं प्रेम करावें । तरीच गांव स्वर्ग व्हावें । सर्वतोपरीं ॥९८॥

भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन । शांतपणें चालाया सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥

शेवटीं जावें सेवकजनें । अतिप्रसन्न होवोनि मनें । स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजीं ॥१००॥ 

लोकांना मार्गी चालतांहि नये । म्हणोनि काढला हा उपाय । गरीब-अमीर-अनपढ सर्व हे । शिकती चालणें यामाजीं ॥१०१॥ 

दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा । गांव पवित्र करी भजनगंगा । वाढे संघटना गांवाची ॥१०२॥

सहजचि चालणें बोलणें येतें । शिस्तीने बसणें उठणें कळतें । गाणें वाजविणेंहि कळों लागतें । गांवच्या दरबारीं ॥१०३॥

घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति । अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥

’ आपण एक ’ ही वाढे भावना । दिगंतीं जाई आळसीपणा । कोणी न वाटे अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥

सर्वांचें सर्वांकरितां वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न । ऐशी आहे रामधून । सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥

ऐशा योजना घेवोनि हातीं । करावी खेडयांची दुरुस्ती । तेणें आनंद लाभेल सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥ 



॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*

” मायबापहो ! ’ पशुकी होत पन्हैया नरका कछु न होय । नर करणी करे तो नरका नारायण होय ’ हें संतांचं म्हणणं लक्षांत घेऊन करणी करा अन स्वत: नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील अन गांव भूवैकुंठ होईल हें ध्यानांत ठेवा. ” 

–श्रीसंत गाडगेबाबा