समीकरण

समीकरण

लगबग लगबग बघ कसे हे
आयुष्य असे चालले l
इतिहास ,तत्वज्ञान ,अर्थ
शास्त्र गणित जाहले ll

रमतांना मग इतिहासात
समाधान लाभते l
बालपणीचे रुसवे फुगवे
निरागसता भावते ll

तत्वज्ञान ते कठीण फार
जन्मदात्रीचे असे l
म्हणून तर जगणे ही
गोष्ट सोपी नसे ll

तत्वज्ञान शिकता शिकता
वर्षोनुवर्षे जाती l
अर्थशास्त्र मग शिकण्याची
ती कठीण वेळ येती ll

धावता धावता त्यामागे मग
केस पांढरे होती l
आठवणी मग प्रत्येक क्षणी
इतिहासातच रमती ll

वेळ येई मग शेवटली ती
गणित शिकण्याची l
आयुष्यातील पाप-पुण्ये
मोजत बसण्याची ll

पाप डावी तर पुण्य
उजवीकडे बसते l
प्रयत्ने करूनही समीकरण
अवघड ते भासते ll

मग आठवण येती
ग्रंथ धर्मशास्त्रांची l
पूजा अर्चना कीर्तने अन्
पारायणे करण्याची ll

समीकरण सोडवताना
घंटा वाजे घणघणा l
परीक्षा संपल्याची ती
असे तीव्र वेदना ll

हृदयाची धकधक आता
थांबणार असते l
निकालाची भीती तरीही
दडून मनी बसते ll

जाणीव होते ती आता
सर्वच संपल्याची l
अन् न सुटलेल्या त्या
अर्ध्या समीकरणाची ll


डॉ. सायली जीवन ठाकरे.

थेंब

थेंब

कोणास ठाऊक म्हणावे
अस्तित्व त्या थेंबाचे
ढगांवरती स्वार त्या
बागडणा-या जलाचे ।।१।।

कोसळतांना त्याला
भय का न वाटावे
खा-या पाण्यावर जाऊन
अस्तित्व त्याचे का मिटावे ? ।।२॥

चातक पक्षालाही
उत्तर कसे मिळावे?
एकाच थेंबात त्याने
तृप्त कसे व्हावे ? ।।३।।

काळयाशार मातीनेही
स्वप्नात का रंगावे?
हिरव्यागार शालींच्या
मोहात का पडावे ?।।४।।

प्राणवायुलाही का
दोस्त त्याने करावे?
बागडणा -या जलचरांच्या
श्वासात का अडकावे ? ।।५।।

समुद्रातल्या शिंपल्यानेही
का आतुर इतके व्हावे ?
उदरातल्या मोत्याच्या
प्रेमात का पडावे ? ।।६।।

कोसळतांना पाहून त्याला
दुषणे का आता द्यावी ?
वरूनाच्या भक्तांनीही
मान जरा झुकवावी ।।७।।

 

डॉ.सायली ठाकरे

गुरु प्रथम ती प्रेमळ

गुरु प्रथम ती प्रेमळ

गुरु प्रथम ती प्रेमळ, आयुष्यास देती आकार ।
इतरांहुनी नऊ माह अधिक,माझी तु जाणकार ।।१।।

यशाचा तु सुर्यप्रकाश,वृक्षाची गार सावली ।
मायेचा अखंड पाझर,अशी माझी तु माऊली ।।२।।

अन्नपुर्णा महालक्ष्मी,तुच दुर्गा महाकाली ।
तुझ्यावाचुन कोण सांग,माझ्या दुःखाचा वाली ।।३।।

प्रथम कंठातील शब्द तु,हृदयाची स्पंदने तु ।
गिरवलेले अक्षर तु, वेदनेची हाक तु ।।४।।

मणिकर्णिका तु जिजाऊ,श्यामची तु भोळी आई।
संस्काराची पाठशाळा,न संपणारी तु अंगाई ।।५।।

आकाशाचा कोरा कागद,अन् समुदाची लई शाई ।
सांग कशी लीहु,आई तुझी गं पुण्याई ।।६।।

डॉ.सायली ठाकरे

शहीद

शहीद

जगत होतो वेगळ्याच स्वप्नात , 
स्वप्नात होती बायको , दोन पोर 
अणि हसणारे एक घर || १ || 

पहात  होतो ते स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी,
आणि माझ्या आयुष्यातील
आठवणीतल्या  सोहळ्यांनी || २ || 

बायको सुंदर नटली होती जणू अप्सराच वाटली होती 
आठवताना तिचे हसु लपवत होतो असवे 
तिच्या आठवणीतल्या तिजोरीत
का होते फक्त रूसवे || ३ ||    

तिचे रूसवे काढायला का नव्हता वेळ ?
सीमेवरच्या मैदानात 
का रोजच बंदुकीचा खेळ || ४ ||  

एकदा दीवाळीला गेलो होतो पोराला बंदूक घेऊन 
का लपून बसला तो  
त्या  अवाजाला भीऊन  || ५ ||  

त्या आवाजात त्याने बाप हरवलेला पाहिला होता 
बंदूक चालवणाऱ्याचा त्याला 
का राग आला होता ? || ६ || 

पोरीला घेऊन  गेलो होतो  मोबाईल खेळण्यातला 
आनंद वाटत होता 
दुरूनच हैल्लो  बोलण्यातला ||  ७ || 

आज हैल्लो बोलायला मोबाइल परत वाजला होता 
फरक फ़क्त एवढाच 
तो आवाज मात्र हरवला होता || ८ || 

तिरंग्यात गुंडाळलेला मी 
पांढऱ्या साडीत बायको पहात  होतो 
तोफांच्या सलामीत  मी 
वंदे  मातरम गात होतो || ९  || 

लेखन : डॉ.सायली ठाकरे