शिवशक्तिसमावेशन

यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् ।
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ १ ॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी ।
जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ २ ॥
सार्द्धं केन च कस्यार्द्धं शिवयोः समरूपिणोः ।
ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ ३ ॥
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् ।
तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ ४ ॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षिणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ ५ ॥
ऐसी इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ १-१ ॥
जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरीं ।
चारुस्थळीं येकाहारी । एकांगाची ॥ १-२ ॥
आवडीचेनि वेगें । येकयेकातें गिळिती अंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥ १-३ ॥
जे एकचि नव्हे एकसरें । दोघां दोनीपण नाहीं पुरें ।
काइ नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ १-४ ॥
कैसी स्वसुखाचि आळुकी । जे दोनीपण मिळोनि येकीं ।
नेदितीचि कवतिकीं । एकपण फुटों ॥ १-५ ॥
हा ठाववरी वोयोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ १-६ ॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ।
परी नेदितीचि तिसरा । झोंक लागों ॥ १-७ ॥
जयां येक सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।
जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
भेदु लाजौनि आवडी । येकरसीं देत बुडी ।
जो भोगणया ठाव काढी । द्वैताचा जेथें ॥ १- ९ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
कैसा मेळु आला गोडिये । दोघें न माती जगीं इये ।
कीं परमाणुही माजीं उवायें । मांडलीं आहाती ॥ १-११ ॥
जिहीं येकयेकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ।
जियें दोघें जिऊ प्राण । जियां दोघां ॥ १-१२ ॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिघे ।
तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ १-१३ ॥
जिया दोघांमाजीं येकादें । विपायें उमजलें होय निदे ।
तरी गरवात गिळूनि नुसुधें । कांहीं ना कीं ॥ १-१४ ॥
दोहों अंगाचिये आटणी । गिंवसीत आहाती येकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाधीं जियें ॥ १-१५ ॥
विषो येकमेकांचीं जियें । जियें एकमेकांचीं विषइयें ।
जियें हीं दोघें सुखियें । जियें दोघें ॥ १-१६ ॥
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे ।
जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
दो दांडीं एकि श्रुति । दोहों फुलीं एकी दृति ।
दोहों दिवीं दीप्ति । येकीचि जेवीं ॥ १-१८ ॥
दो ओठीं येकी गोठी । दो डोळां येकी दिठी ।
तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । येकीच जेवीं ॥ १-१९ ॥
दाऊनि दोनीपण । येक रसाचें आरोगण ।
करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ १-२० ॥
जे स्वामिचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता ।
जियेवीण सर्व कर्ता । कांहीं ना जो ॥ १-२१ ॥
जें कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें ससणें ।
नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ १-२२ ॥
गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु ।
निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥
समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवुचि लाभे ॥ १-२४ ॥
जैसी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा ।
तैसी भेद गिळीत शोभा । येकचि जे ॥ १-२५ ॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ १-२६ ॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्तविशेषु । शक्ति जाली ॥ १-२७ ॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवीहीं शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें घडली ॥ १-२८ ॥
ऐश्वर्येंसी ईश्वरा । जियेचें आंग संसारा ।
आपण होऊन उभारा । आपणचि जे ॥ १-२९ ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
ऐक्याचाही दुष्काळा । बहुपणाचा सोहळा ।
जियें सदैवेचिया लिळा । दाखविला ॥ १-३१ ॥
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ १-३२ ॥
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्ट्रत्वाचिया क्षोभा ।
जियेतें न देखतु उभा ॥ आंगचि सांडी ॥ १-३३ ॥
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेव्हढा ।
आंगविला उघडा । जियेविण ॥ १-३४ ॥
जो हा ठावो मंदरूपें । उवायिलेपणेंचि हारपे ।
तो झाला जियेचेनि पडिपे । विश्वरूप ॥ १-३५ ॥
जिया चेवविला शिवु । वेद्याचे बोणें बहु ।
वाढि तेणेंसि जेऊं । धाला जो ॥ १-३६ ॥
निदैलेनि भातारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥ १-३७ ॥
जंव कांतु लपो बैसे । तंव नेणिजे जिच्या दोषें ।
जियें दोघें आरिसे । जियां दोघां ॥ १-३८ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रियुचि जियेचें चांग ।
कालउनी दोन्ही भाग । जेवितें आहाति ॥ १-४० ॥
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति ।
तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो ।
तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही जियें ॥ १-४३ ॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें ।
दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४ ॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळित येकार्थाचा उजिरा ।
नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु म्हणे ॥ १-४५ ॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।
आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ १-४६ ॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।
सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी ॥ १-४७ ॥
वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं ।
आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ १-४८ ॥
तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें ।
पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं तियें ॥ १-४९ ॥
जयांच्या वाहाणी । वेदकु वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥ १-५० ॥
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।
तही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां ।
एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।
काई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ।
आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? ।
कीं णकार तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।
मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।
कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥

श्रीगुरुस्तवन

आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥
अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।
तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो कीं ॥ २-२ ॥
मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरु ।
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २-३ ॥
जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते ।
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ २-४ ॥
कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥
सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।
आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥
बोधचंद्रचिया कळा । विखुरलिया येकवळा ।
कृपापुनीवलीळा । करी जयाची ॥ २-७ ॥
जो भेटलियाचि सवे । पुरति उपायांचे धांवे ।
प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ २-८ ॥
जयाचेनि अनवसरें । दृष्टाले दृश्याचें मोहिरें ।
जो भेटतखेंव सरे । बहुरुपचि हें ॥ २-९ ॥
अविद्येचें काळवखें । कीं स्वबोध सुदिनें फांके ।
सीतलें प्रसादार्कें । जयाचेंनि ॥ २-१० ॥
जयाचेनि कृपासलिलें । जीउ हा ठाववरी पाखाळे ।
जें शिवपणहि वोंविळें । अंगी न लवी ॥ २-११ ॥
राखों जातां शिष्यातें । गुरुपणहि धाडिलें थितें ।
तही गुरुगौरव जयातें । सांडीचिना ॥ २-१२ ॥
एकपण नव्हे सुसास । म्हणोन गुरु-शिष्यांचें करोनि मिस ।
पाहणेंचि आपली वास । पाहतसे ॥ २-१३ ॥
जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें ।
परिणमे अपारें । बोधामृतें ॥ २-१४ ॥
वेद्या देतां मिठी । वेदकुहि सुये पोटीं ।
तही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ २-१५ ॥
जयाचेनि सावायें । जीवु ब्रह्म उपर लाहे ।
ब्रह्म तृणातळीं जाये । उदासे जेणें ॥ २-१६ ॥
उअपस्तिवरि राबतिया । उपाय फळीं येती मोडोनियां ।
वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा कां ॥ २-१७ ॥
जयाचा दिठिवावसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु ।
तंव आपुलिये फळीं हातु । न घेपतिही ॥ २-१८ ॥
पुढें दृष्टीचेनि आलगें । खोंचि कीं निवटी मागें ।
येव्हडिया जैता नेघे । आपणपें जो ॥ २-१९ ॥
लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले ।
नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ २-२० ॥
नाहीं जे जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे ।
जेणें तरलियाहि नुरिजे । कवणिये ठाईं ॥ २-२१ ॥
आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव ।
ऐसें कोण्ही येक भरीव । आकाश जो ॥ २-२२ ॥
चंद्रादि सुसीतळें । घडलीं जयाचेनि मेळें ।
सूर्य जयाचेनि उजाळें । कडवसोनि ॥ २-२३ ॥
जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे ।
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ २-२४ ॥
चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें ।
तही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ २-२५ ॥
जो उघड किं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे ।
असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ २-२६ ॥
आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळऊं अनुमानाची मांदी ।
हा प्रमाणाहि वो नेदी । कोण्हाहि मा ॥ २-२७ ॥
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे ।
दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥
प्रमाणापरि सरे । तैं प्रमेयचि आविष्करे ।
नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥ २-२९ ॥
कांहींबाहीं अळुमाळु । देखिजे येखादे वेळु ।
तरी देखे तेहि विटाळु । जया गांवीं ॥ २-३० ॥
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें ।
आंगीं लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥ २-३१ ॥
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ? ।
तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? ।
तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥
सूर्यासि अंधकारु । कैं झाला होता गोचरु ? ।
तही तमारि हा डगरु । आलाचि कीं ॥ २-३४ ॥
लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे ।
न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ २-३५ ॥
हां गा मायावशें दाविसी । तें मायिक म्हणोन वाळिसी ।
अमायिक तंव नव्हसी । कवणाहि विषो ॥ २-३६ ॥
शिवशिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? ।
येकाहि निर्धारा धरूं । देतासि कां ? ॥ २-३७ ॥
नामें रूपें बहूवसें । उभारूनि पाडिलीं ओसें ।
सत्तेचेनि आवेशें । तोषलासि ना ? ॥ २-३८ ॥
जिउ घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें ।
भृत्यु उरे स्वामीपणें । तेंहि नव्हे ॥ २-३९ ॥
विशेषाचेनी नांवें । आत्मत्वही न साहावे ।
किंबहुना न व्हावें । कोण्हीच या ॥ २-४० ॥
राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।
नुरेचि जेवी चेइलिया । नीद जैसी ॥ २-४१ ॥
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ २-४२ ॥
याच्या हातांपायां पडे । तरी वंद्यत्वें पुढें न मंडे ।
न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ २-४३ ॥
आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं ।
हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥
कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें ।
तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥
आकाशाचाआरिसा । नुठे प्रतिबिंबाचा ठसा ।
हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी ॥ २-४६ ॥
परी नव्हे तरी नव्हो । हें वेखासें कां घेवो ।
परी वंदीतयाहि ठावो । उरों नेदी ॥ २-४७ ॥
आंगौनि येकुणा झोळु । फेडितांचि तो तरी बाहिरिळू ।
कडु फिटे आंतुलु । न फेडितांचि ॥ २-४८ ॥
नाना बिंबपणासरिसें । घेऊनि प्रतिबिंब नासे ।
नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदितेंनसीं ॥ २-४९ ॥
नाहीं रूपाचि जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींचि नव्हे ।
आम्हां फळले हे पाये । ऐसिया दशा ॥ २-५० ॥
गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका ।
ते का होईल पुळिका । कापुराचिया ॥ २-५१ ॥
तया दोहों परस्परें । होय ना जंव मेळहैरें ।
तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ २-५२ ॥
तेविं देखेना कायी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें ।
चेइलिया कांतें । स्वप्नींचें जेवीं ॥ २-५३ ॥
किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथें उपखा ।
फेडोनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ २-५४ ॥
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपण रूप नाहीं ।
आणि गुरु-शिष्य दुबाळीही । पवाडु केला ॥ २-५५ ॥
कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण ।
हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥
जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये ।
तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥
कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु ।
तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥
तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥
येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ? ।
विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥
म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥
कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें ।
वसतें चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ २-६२ ॥
नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु ।
गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥
इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे ।
जही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।
आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥
पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला ।
परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥
जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी ।
गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥
दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥
एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्यासी विसकुसों ।
सोईरिकीचा अतिसो । पोखितसे ॥ २-६९ ॥
निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।
जया निवृत्तीची राणीव । निवृत्तिचि ॥ २-७० ॥
वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें ।
आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ २-७१ ॥
आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति ।
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ २-७२ ॥
वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ ।
तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ २-७३ ॥
गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ।
तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ २-७४ ॥
तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।
घेयावया फुलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ २-७५ ॥
दिठी मुखाचिये बरवे । पाथीकडोनि जैं पावे ।
तैं आरिसे धांडोलावे । लागती काई ? ॥ २-७६ ॥
कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥
ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे गुरुस्तवनम् नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥

वाचाऋण परिहार

ययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे ।
पूर्ण तही ऋण न फिटे । जें चेणोंचि नीद कीं ॥ ३-१ ॥
येहवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं ।
अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥
देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें ।
कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।
तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।
जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥
लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।
नीद मरोनि जागरें । जिइजे निदें ॥ ३-६ ॥
तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें ।
तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।
तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।
दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥
जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी ।
तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥
परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।
बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥
मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? ।
अज्ञान घरी त्राये । वाउगीची ॥ ३-१२ ॥
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।
मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? ।
मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥
आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितलें असे । सदाशिवें ॥ ३-१६ ॥
आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।
बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।
मानु तेहि लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥
जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥
ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये ।
दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥
आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।
आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥
तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि आपली प्रमा ।
करितसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥
जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे ।
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥
म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा ।
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥
आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु ।
करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।
परि होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥
अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती ।
परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥
ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे ।
तहीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।
असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।
आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।
तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥
म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे वाचाऋणपरिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥

ज्ञानाज्ञानभेदकथन

आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला ।
मुख भोगी आपुला । आपणचि ॥ ४-२ ॥
ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ।
तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जालें ॥ ४-३ ॥
लावी आंत ठावूनि कोपट । तो साधी आपणया सकट ।
का बांधलया चोरट । मोटेमाजी ॥ ४-४ ॥
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।
ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जालें ॥ ४-५ ॥
अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका ।
फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ ४-६ ॥
दशाही ते निमालिया । येणें जें उवाया ।
तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ ४-७ ॥
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणे ।
फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ४-८ ॥
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।
कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ ४-९ ॥
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान ।
जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ ४-१० ॥
जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळाजळा दोहींतें ।
बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ ४-११ ॥
कीं विश्वाहि वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ।
तैं तेज तम निखळ । तेंचि होय ॥ ४-१२ ॥
नाना नीद मारोनि । आपणपें हिरौनि ।
जागणें ठाके होवोनि । जागणेंचि ॥ ४-१३ ॥
तैसे अज्ञान आटोनियां । ज्ञान येतें उवाया ।
ज्ञानाज्ञान गिळूनियां । ज्ञानचि होय ॥ ४-१४ ॥
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
कां तेजांतरें नाटोपे । कोण्हे तमें न सिंपे ।
तें उपमेचें जाउपें । सूर्यचि होय ॥ ४-१६ ॥
म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।
तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥ ४-१७ ॥
परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें ।
काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ ४-१८ ॥
आकाश आपणया रिगे ? । कायी आगि आपणया लागे ? ।
आपला माथा वोळघें । आपण कोण्ही ? ॥ ४-१९ ॥
दिठि आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? ।
नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ ४-२० ॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? ।
परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥
तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।
म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥
आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।
तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥
जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।
मा तेज जही होये । तेजासी काईं ? ॥ ४-२४ ॥
तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।
आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ? ।
नसता हा अपवादु । वस्तुसि जो ॥ ४-२७ ॥
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥
म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।
नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥
परी आणिका कां आपणया । न पुरे विषो होआवया ।
म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ ।
परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।
हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे ।
परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥
कां काळा राहे काळवखा । तो आपणया ना आणिका ।
न चोजवे तही आसिका । हा मी बाणे ॥ ४-३६ ॥
तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानुसवाणें ।
नसोनि असणें । ठाये ठावो ॥ ४-३७ ॥
निर्मळपणीं आपुळा । आकाशाचा संचु विराला ।
तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ ४-३८ ॥
कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया पोखरणीं ।
हें आणिकावांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ ४-३९ ॥
आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे ।
आहे नाहीं ऐसें । सांडोनिया ॥ ४-४० ॥
निदेचें नाहींपण । निमालियाहि जागेंपण ।
असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ ४-४१ ॥
कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।
तो नेलियां म्हणिजे । तेणेंवीण ॥ ४-४२ ॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ ४-४३ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥

सच्चिदानंदपदत्रयविवरण

सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीं उणे लेख ।
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ ५-१ ॥
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ ५-२ ॥
उजाळ दृति मार्दव । या तिन्हीं तिहीं उणीव ।
हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ ५-३ ॥
आंगें कीर उजाळ । कीं उजाळ तोचि मवाळ ।
कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ ५-४ ॥
ऐसें एके कापुरपणीं । तिन्ही इये तिन्ही उणी ।
इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ ५-५ ॥
येहवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें ।
परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ ५-६ ॥
सत्ताचि कीं सुख प्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु ।
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ५-७ ॥
शुक्लपक्षींच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।
परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ ५-८ ॥
थेंबीं पडतां उदक । थेंबीं धरूं ये लेख ।
परि पडिला ठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ ५-९ ॥
तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ ५-१० ॥
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ ५-११ ॥
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें ।
लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ ५-१२ ॥
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥
सूर्याचेनि प्रकशें । जें कांहीं जड आभासें ।
तेणें तो गिंवसें । सूर्यु कयी ? ॥ ५-१४ ॥
तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्य सुजें ।
ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ ५-१५ ॥
विषो नाहीं कोण्हाहि । जया प्रमेयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होय ॥ ५-१६ ॥
प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें कायि स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ ५-१७ ॥
एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्वता ।
मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ १८ ॥
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हे शेष । विचाराचे ॥ ५-१९ ॥
ऐसेनि इयें प्रसिद्धे । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ ५-२० ॥
ते वेळीं वरिसोनि मेघु । समुद्र होउनि वोघु ।
सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ ५-२१ ॥
फळ विऊनि फुल सुके । फळनाशे रस पाके ।
तोहि रस उपखें । तृप्तिदानीं ॥ ५-२२ ॥
कां आहुति अग्नीआंतु । घालूनि वोसरे हातु ।
सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥ ५-२३ ॥
नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निगोनि ।
कां निदैलें चेववुनी । चेववितें जैसें ॥ ५-२४ ॥
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ ५-२५ ॥
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ ५-२६ ॥
मग आपलियाकडे । मावितया से पडे ।
तैं लाजहिला जो आखुडे । मविते जैसें ॥ ५-२७ ॥
जैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ।
मा सत्तात्व संभवे । सत्तेसि कायि ? ॥ ५-२८ ॥
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं इये ॥ ५-२९ ॥
नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे तैसें जागणेंहि ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं ये ? ॥ ५-३० ॥
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ ५-३१ ॥
म्हणोनि सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ ५-३२ ॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक ।
सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥ ५-३३ ॥
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ ५-३४ ॥
तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥
जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे ।
मां डंकूचि तैं भरे । कोणकोणा ? ॥ ५-३६ ॥
तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥
आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ ५-३८ ॥
सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडोनिया निदसुरिया ।
आपुलिया हात चोरिया । आपणचि जो ॥ ५-३९ ॥
न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥
कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा ।
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥
नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।
आपणचि भंवरा । होआवे पडे ॥ ५-४२ ॥
नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे ।
हें पाहणें तें नोहे । आणिकाजोगें ॥ ५-४३ ॥
तैसें सुखपणा येवो । लाजे आपुलें सुख पावों ।
तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ ५-४४ ॥
दिहाचिया दुपारीं । चांदु जैसा अंबरीं ।
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ ५-४५ ॥
रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य ।
क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ ५-४६ ॥
जैं मनाचा अंकूर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।
तोचि हन माजे । तरीचि घडे ॥ ५-४७ ॥
कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।
तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ ५-४८ ॥
नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलिया अनळा ।
लाग्णें तैं केवळा । अंगासीचि ॥ ५-४९ ॥
दर्पणाचेनि नियमें । वीणचि मुखप्रमे ।
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ ५-५० ॥
न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें ।
ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ ५-५१ ॥
एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य ।
तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ ५-५२ ॥
आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।
जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ ५-५३ ॥
एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण ।
दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ ५-५४ ॥
अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।
येथें उठली पांती । लक्षणाची ॥ ५-५५ ॥
उपाय मागील पाय । घेऊन झाले वाय ।
प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥ ५-५६ ॥
येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि झाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ ५-५७ ॥
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८ ॥
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ ५-५९ ॥
कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैंचा कीजे ? ॥ ५-६० ॥
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी ।
तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥
कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी ।
मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी ।
कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥
उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती ।
वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जही ॥ ५-६६ ॥
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥

शब्दखंडण

बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ ६-१ ॥
पहातें आरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें , पाहतें ॥ ६-२ ॥
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥
आपण तंव खपुष्प । परि फळ ते जगद्रूप ।
शब्द मवीतैं उमप । कोण आहे ? ॥ ६-४ ॥
विधिनिषेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ।
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ ६-५ ॥
हा अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६-६ ॥
शुद्ध शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी ।
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ ६-७ ॥
जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला ।
आत्मा बोलें भेटला । आपणयां ॥ ६-८ ॥
दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।
म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ ६-९ ॥
जे प्रवृत्ति आअणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती ।
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ ६-१० ॥
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।
गोमटे काय शब्दाचें । येकैक वानूं ॥ ६-११ ॥
किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
परी ययाही संबंधु । नाहीं येथें ॥ ६-१२ ॥
आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे ।
स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ ६-१३ ॥
आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे ।
तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥ ६-१४ ॥
आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? ।
काय जीभ जिभितें । चाखे न चाखे ? ॥ ६-१५ ॥
जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? ।
स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? ।
तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥
एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? ।
म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥
आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे ।
परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥ ६-१९ ॥
कां जे बोलें अविद्याअ नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे ।
हें म्हणतखेवो पिसें । आलेंचि कीं ॥ ६-२० ॥
सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील ।
हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ ६-२१ ॥
चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? ।
कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ ६-२२ ॥
म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती ।
नाहीं आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥ ६-२३ ॥
अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें ।
मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ ६-२४ ॥
इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें ।
तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ ६-२५ ॥
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।
तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ ६-२६ ॥
साहे बोलाची बळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।
तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ ६-२७ ॥
नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे ।
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ ६-२८ ॥
नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।
तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ ६-२९ ॥
जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें ।
मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ ६-३० ॥
दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।
तेविं अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ ६-३१ ॥
वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।
नागवें नागविलिया । विशेषु काई ॥ ६-३२ ॥
मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।
परि उपवासावेगळ । आनु आथी ? ॥ ६-३३ ॥
मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें ।
माउमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ ६-३४ ॥
हें दिसे तैसें असे । तरी चित्रीचेनि पाउसें ।
वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ ६-३५ ॥
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें ।
तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥ ६-३६ ॥
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? ।
तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ ६-३७ ॥
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे ।
हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ ६-३८ ॥
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।
आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥ ६-३९ ॥
का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? ।
वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ ६-४० ॥
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।
सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ ६-४१ ॥
हे अविद्या तरी मायावी । परि मायावीपणचि लपवी ।
साचा आली अभावी । आपुला हे ॥ ६-४२ ॥
बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं ।
आतां बोलू हातवसी । कवणापरी ॥ ६-४३ ॥
साउलियेतें साबळें । हालयां भोय आदळे ।
कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ ६-४४ ॥
कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं ।
नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाचा ॥ ६-४५ ॥
उठावला वोथरे तवंका । तो सुनाथ पडे असिका ।
अविद्या नाशीं तर्का । तैसें होय ॥ ६-४६ ॥
ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं ।
तेणें साली काढावी । आकाशाची ॥ ६-४७ ॥
तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी ।
वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ६-४८ ॥
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू ।
कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । ६-४९ ॥
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।
वारयाचे तांथु । वळु सुखें ॥ ६-५० ॥
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू ।
तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥
घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू ।
सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥
तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू ।
वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥
तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें ।
मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥
अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।
आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥
नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।
अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ६-५६ ॥
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती ।
जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥ ६-५७ ॥
न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती ।
तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ ६-५८ ॥
खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा ।
तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ६-५९ ॥
पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु ।
अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ ६-६० ॥
माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे ।
तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये ।
मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे ।
खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।
परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥
दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे ।
चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ।
जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६-६६ ॥
नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा ।
अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ ६-६७ ॥
तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।
उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६-६८ ॥
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? ।
अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥ ६-६९ ॥
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें ।
निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ ६-७० ॥
कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ।
तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ ६-७१ ॥
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई ।
परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ ६-७२ ॥
यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा ।
आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ ६-७३ ॥
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।
हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ ६-७४ ॥
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया ।
येईल हें साविया । विरुद्धचि ॥ ६-७५ ॥
आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं ।
कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ ६-७६ ॥
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? ।
तळहात काय वळघे । आपणयां ? ॥ ६-७७ ॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? ।
परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ ६-७८ ॥
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं ।
परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥ ६-७९ ॥
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा ।
जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ६-८० ॥
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।
वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ ६-८१ ॥
आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया ।
समोर होआवया । ठाकी आहे ? ॥ ६-८२ ॥
दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? ।
कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ ६-८३ ॥
चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी ।
मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥ ६-८४ ॥
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।
रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ ६-८५ ॥
आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।
परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ ६-८६ ॥
तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव ।
आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ ६-८७ ॥
आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे ।
डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ ६-८८ ॥
आरसा आपुलिये । आंगीं आपण पाहे ।
तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ ६-८९ ॥
दिगंतापैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।
मा तियेका तियेचें । आंग फुटे ? ॥ ६-९० ॥
रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें ।
परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥ ६-९१ ॥
तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? ।
तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥ ६-९२ ॥
तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।
आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ ६-९३ ॥
कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें ।
जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ ६-९४ ॥
म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे ।
येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥ ६-९५ ॥
एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी ।
तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥
ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी ।
हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥
आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं ।
अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥
बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें ।
कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें ।
शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ ६-१०१ ॥
एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।
साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ ६-१०२ ॥
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।
अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ ६-१०३ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥

अज्ञानखंडण

येहवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा ।
तैं तरि काना । खालींच दडे ॥ ७-१ ॥
अंडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी ।
तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ ७-२ ॥
जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा ।
तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ ७-३ ॥
कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं ।
नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ ७-४ ॥
हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंहि आन न करी ।
काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ ७-५ ॥
आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें ।
येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ ७-६ ॥
असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ।
मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानचि लटिकें ॥ ७-७ ॥
या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें ।
तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ ७-८ ॥
अज्ञान जेथ असावें । तेणें सर्वनेण होआवें ।
ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ७-९ ॥
तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे ।
तेणेचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ ७-१० ॥
तरी निठितां दुजें । जैं अज्ञान आहे बिजें ।
तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ ७-११ ॥
अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें ।
आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ ७-१२ ॥
या लागिं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान ।
हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ ७-१३ ॥
आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख ।
तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ ७-१४ ॥
अहो आपणयाहि पुरता । नेणु न करवे जाणता ।
तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ ७-१५ ॥
आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? ।
सुषुप्ती सुषुप्तया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ ७-१६ ॥
तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें ।
तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ ७-१७ ॥
ना तरी अज्ञान येक घडे । हें जयास्तव निवडे ।
तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ ७-१८ ॥
पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा ।
तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ ७-१९ ॥
इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी ।
तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥ ७-२० ॥
आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी ।
तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥
वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे ।
दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥
तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके ।
तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥
येहवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया ।
कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥
अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी ।
आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥
स्वप्न आणि जागरु । आठउ आणि विसरु ।
इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ ७-२६ ॥
शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट ।
कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ ७-२७ ॥
नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों ।
तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ ७-२८ ॥
हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे ।
तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ ७-२९ ॥
अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे ? ।
ऐसीं काईसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ ७-३० ॥
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज ।
जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । ७-३१ ॥
दुलांकूडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें ।
तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ ७-३२ ॥
का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो ।
सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ ७-३३ ॥
तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे ।
येहवीं अज्ञान होये । लागलाचि ॥ ७-३४ ॥
आत्मेनसी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ।
वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ ७-३५ ॥
लवणाची मासोळी । जरी जाली निवाळी ।
तरी जळीं ना जळावेगळी । न जिये जेवीं ॥ ७-३६ ॥
जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ।
म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ ७-३७ ॥
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? ।
ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ७-३८ ॥
नाना पुनिवेचे आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें ।
कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ ७-३९ ॥
तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा ।
हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ ७-४० ॥
तरी अज्ञान स्वरूपें कैसें । काय कार्यानुमेय असे ।
कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥ ७-४१ ॥
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी ।
ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ ७-४२ ॥
जैसी अंकुरेंसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ ।
तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होय ॥ ७-४३ ॥
कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टी आरोपें ।
तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥ ७-४४ ॥
नाना चांदु एक असे । तो व्योमीं दुजा दिसे ।
तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे ॥ ७-४५ ॥
तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ।
तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥ ७-४६ ॥
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्यविशेखीं ।
नेघे तें असेये विखीं । आनु नाहीं ॥ ७-४७ ॥
अज्ञान कार्यपणें । घेइजे तें अज्ञान म्हणे ।
तरी घेतांहि करणें । तयाचेंची ॥ ७-४८ ॥
स्वप्नीं दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन ।
तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥ ७-४९ ॥
तरी चाखिला गुळ गुळें । माखिलें काजळ काजळें ।
कां घेपे देपे शुळें । हालया सुळु ॥ ७-५० ॥
तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ।
तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ ७-५१ ॥
आतां घेतें घेइजेतें ऐसा । विचारु नये मानसा ।
तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ ७-५२ ॥
तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा ।
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ ७-५३ ॥
मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी ।
येणें बोलें ही जाणावी । अज्ञानउखी ॥ ७-५४ ॥
एवं प्रत्यक्ष अनुमान । प्रमाणां भाजन ।
नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ७-५५ ॥
ना स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ।
मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥ ७-५६ ॥
आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहू ।
परि ठायें ठाउ । निदेजउं नेणें ॥ ७-५७ ॥
हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें ।
आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥ ७-५८ ॥
जैसें न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान ।
जैसें कां हुताशन । सामर्थ्यांचें ॥ ७-५९ ॥
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव ।
तैं कांहीं अज्ञान हांव । बांधतें कां ? ॥ ७-६० ॥
काइ दीप जैं न लाविजे । तैंचि काजळी फेडिजे ।
कां नुगवत्या वाळिजे । रुखाची छाया ॥ ६१ ॥
नाना नुठितां देहदशा । कालऊनि लाविजे चिकसा ।
न घडितां आरिसा । उटिजे काई ॥ ६२ ॥
कां वोहाच्या दुधीं । सायचि असावी आधीं ।
मग ते फेडूं इये बुद्धी । पवाडु कीजे ॥ ७-६३ ॥
तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मपणा ठवो नाहीं ।
तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ७-६४ ॥
म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे । हें जालेंचि आहे आपैसें ।
आतां रिकामेंचि काइसें । नाहीं म्हणो ॥ ७-६५ ॥
ऐसाहि आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा ।
अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ ७-६६ ॥
जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण ।
कीं सर्वांपरी मरण । मालवलें कीं ॥ ७-६७ ॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली ।
कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ ७-६८ ॥
काअभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला ।
चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ ७-६९ ॥
कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख ।
नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ ७-७० ॥
तैसें अज्ञान आपुली वेळ । भोगी हेचि टवाळ ।
आतां तरी केवळ । वस्तु होऊनि नसे ॥ ७-७१ ॥
देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? ।
कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ ७-७२ ॥
तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ।
घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ ७-७३ ॥
जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें।
ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ ७-७४ ॥
नाना नीद धरावया हातीं । चेउनी उठिला झडती ।
ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ ७-७५ ॥
तेवीं पाहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं पिसें काइसें ।
न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ ७-७६ ॥
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी ।
न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ ७-७७ ॥
अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें ।
विचाराचे डोळे । देखते का ? ॥ ७-७८ ॥
ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नाइके ।
कीं निरुती हन मुके । अनसाईपणा ॥ ७-७९ ॥
इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु ।
निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ ७-८० ॥
अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये शोभे ।
कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ ७-८१॥
नाना गगनौलाचिया माळा । वांजेच्या जालया गळा ।
घापती तो सोहळा । पाविजत असे ॥ ७-८२ ॥
आणून कांसवीचें तुप । भरू आकाशाचें माप ।
तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ७-८३ ॥
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती ।
तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥
म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें ।
परी आन येक स्फुरे । इयेविषयीं ॥ ७-८५ ॥
आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें ।
वस्तु ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ ७-८६ ॥
तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हडें ।
आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ ७-८७ ॥
जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हडें ।
उठिलें तरी रोकडें । देखतसों ॥ ७-८८ ॥
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ।
यया दृश्यानुमान । प्रमाण जालें ॥ ७-८९ ॥
ना तरी चंद्रु येक असे । तो व्योमीं दुणावला दिसे ।
तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ ७-९० ॥
भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ।
न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥
तरी भरंवसेनि मुळें । पाणी घेती हें न टळें ।
तैसें अज्ञान कळें । दृष्यास्तव ॥ ७-९२ ॥
चेइलिया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे ।
परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ ७-९३ ॥
म्हणोन वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके ।
तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ ७-९४ ॥
अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें ।
काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ ७-९५ ॥
अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ ।
तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥
आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी ।
अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥
कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा ।
तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥
वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे ।
ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥
तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु ।
तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥
तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? ।
येहवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ ७-१०१ ॥
कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे ।
तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ ७-१०२ ॥
असे म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें ।
परी नाहीं हें न लागे । जोडावेंचि ॥ ७-१०३ ॥
कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे ।
हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ ७-१०४ ॥
मिथ्यावादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली ।
विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ ७-१०५ ॥
जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ? ।
परी दृश्याचिये न टेके । सोईं जो ॥ ७-१०६ ॥
वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें ।
ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ ७-१०७ ॥
सूर्यो कोणा न पाहे ? । परि आत्मा दाविला आहे ? ।
गगनें व्यापिता ठाये । ऐसी वस्तु ॥ ७-१०८ ॥
देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी ।
तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ ७-१०९ ॥
बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके ।
मना संकल्प निके । याहीहुनि ॥ ७-११० ॥
विषयाची बरडी । अखंड घासती तोंडीं ।
तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ ७-१११ ॥
परी नाहींपणासगट । खाऊनि भरिलें पोट ।
ते कोणाही सगट । कां फावेल ? ॥ ७-११२ ॥
जो आपणासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो ।
जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ ७-११३ ॥
हें असो नामें रूपें । पुढां सुनि अमूपें ।
जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ७-११४॥
म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक ।
न वाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ ७-११५ ॥
नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेर सवडे ।
तैसा निर्णो सुनाथा पडे । केला जेथें ॥ ७-११६ ॥
कां मस्तकान्त निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली ।
तयाची फांवली । बुद्धि जैसी ॥ ७-११७ ॥
तैसें टणकोनि सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था ।
करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ ७-११८ ॥
आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें ।
दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ ७-११९ ॥
जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें ।
फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ ७-१२० ॥
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण ।
द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ ७-१२१ ॥
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? ।
ऐक्यासकट पोटें । आटोनि गेलीं ॥ ७-१२२ ॥
येव्हढेंही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे ।
उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ ७-१२३ ॥
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी ।
उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ ७-१२४ ॥
दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा ।
जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ ७-१२५ ॥
क्षणीं क्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी ।
दिठीकरवीं वेढवी । उदार जे ॥ ७-१२६ ॥
मागिलिये क्षणीचीं अंगें । पारुसी म्हणोनियां वेगें ।
सांडूनि दृष्टि रिगे । नवेया रूपा ॥ ७-१२७ ॥
तैसीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं ।
लेऊनि आणी । जाणतेपण ॥ ७-१२८ ॥
तया परमात्मपदीचें शेष । ना काहीं तया सुसास ।
आणि होय येव्हडी कास । घातली जेणें ॥ ७-१२९ ॥
सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचे तोंडवरी ।
परी तें आन घरीं जाणिजेना ॥ ७-१३० ॥
एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी ।
दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ ७-१३१ ॥
तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे ।
तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ ७-१३२ ॥
तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे ।
जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ७-१३३ ॥
अंगें अंगवरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।
तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ ७-१३४ ॥
पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें ।
वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥
गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा ।
भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥ ७-१३६ ॥
किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें ।
तरी सूर्यासि दुसरें । बोलों येईल ? ॥ ७-१३७ ॥
चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडिलिया बहुवसु ।
काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ ७-१३८ ॥
दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी ।
परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ ७-१३९ ॥
सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रर्जुना राया ।
तरी तो काय तिया । येकोत्तरावा ? ॥ ७-१४० ॥
सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा ।
परी ताथुवीं दुजा । भाव आहे ? ॥ ७-१४१ ॥
कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा ।
मीनला तही वाचा । मात्र कीं ते ॥ ७-१४२ ॥
तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।
उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ ७-१४३ ॥
गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा ।
जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ ७-१४४ ॥
तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको ।
परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ ७-१४५ ॥
तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा ।
जही विश्वा अशेखा । भरला आहे ॥ ७-१४६ ॥
दुबंधा क्षिरोदकीं । बाणें परी अनेकीं ।
दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ ७-१४७ ॥
पातयाचि मिठी । नुकलितां दिठी ।
अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ ७-१४८ ॥
न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका ।
तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ ७-१४९ ॥
मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें ।
तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ ७-१५० ॥
पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी ।
आपुलेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ ७-१५१ ॥
कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु ।
ना कूर्मी गिली विस्तारु । आपेंआप ॥ ७-१५२ ॥
अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं ।
स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥
तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे ।
तया नांव वावटे । आपणपयां ॥ ७-१५४ ॥
सहजें आघवेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? ।
तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ ७-१५५ ॥
नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो ।
तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ ७-१५६ ॥
जें अनादिच दृश्यपणें । अनादिच देखणें ।
हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ ७-१५७ ॥
अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना ।
कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ? ॥ ७-१५८ ॥
विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे फुडें ।
ना तें नाहीं तेव्हढें । नाहींची देखे ॥ ७-१५९ ॥
विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही ।
तही दशा ऐसिही । देखतचि असे ॥ ७-१६० ॥
कापुराहि आथी चांदिणें । कीं तोचि न माखे तेणें ।
तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥ ७-१६१ ॥
किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे ।
देखतचि असे । आपणपयातें ॥ ७-१६२ ॥
मनोरथांचीं देशांतरें । मनीं प्रकाशून नरें ।
मग तेथें आदरें । हिंडे जैसा ॥ ७-१६३ ॥
कां दाटला डोळा डोळ्यां । डोळा चितारा होऊनियां ।
स्फुरे चोख म्हणौनियां । विस्मो नाहीं ॥ ७-१६४ ॥
यालागीं एकें चिद्रूपें । देखिजे कां आरोपे ।
आपणयां आपणपें । काय काज ? ॥ ७-१६५ ॥
किळेचें पांघरुन । आपजवी रत्न कोण ? ।
कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ ७-१६६ ॥
चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? ।
कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ ७-१६७ ॥
कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? ।
कीं ताऊन ऊन केलें । आगीतें काई ? ॥ ७-१६८ ॥
ना ना ते लता । आपुले वेली गुंडाळितां ।
घर करी न करितां । जयापरी ॥ ७-१६९ ॥
कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला ।
तैसा चैतन्यें गिंवसला । चिद्रूप स्फुरे ॥ ७-१७० ॥
ऐसें आपणया आपण । आपुलें निरीक्षण ।
करावें येणेंवीण । करितुचि असे ॥ ७-१७१ ॥
ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधरें चांदिणें ।
मा चंद्रासि उणें । स्फुरतें का ? ॥ ७-१७२ ॥
म्हणोनि हें न व्हावे । ऐसेंही करूं पावे ।
तरी तैसाचि स्वभावें । आयिता असे ॥ ७-१७३ ॥
द्रष्टा दृश्य ऐसें । अळुमाळु दोनी दिसे ।
तेंही परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥ ७-१७४ ॥
तेथें दृश्य द्रष्टां भरे । । द्रष्टेपण दृश्यीं न सरे ।
मा दोन्ही न होनि उरे । दोहींचें साच ॥ ७-१७५ ॥
मग भलतेथ भलतेव्हां । माझारीले दृश्य-द्रष्टाभावा ।
आटणी करीत खेंवा । येती दोन्ही ॥ ७-१७६ ॥
कापुरीं अग्निप्रवेशु । कीं अग्नि घातला पोतासु ।
ऐसें नव्हे संसरिसु । वेंचु जाला ॥ ७-१७७ ॥
येका येकु वेंचला । शून्य बिंदु शून्यें पुसिला ।
द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥ ७-१७८ ॥
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया ।
झोंबीसकट आटोनियां । जाईजे जेवीं ॥ ७-१७९ ॥
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी ।
येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ ७-१८० ॥
सिंधु पूर्वापर । न मिळती तंवचि सागर ।
मग येकवट नीर । जैसें होय ॥ ७-१८१ ॥
बहुये हें त्रिपुटी । सहजें होतया राहटी ।
प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ? ॥ ७-१८२ ॥
दोनी विशेषें गिळी । ना निर्विशिष्टातें उगळी ।
उघडीझांपी येकेंच डोळीं । वस्तुचि हे ॥ ७-१८३ ॥
पातया पातें मिळे । कीं दृष्ट्ट्त्वें सैंघ पघळे ।
तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥ ७-१८४ ॥
द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी ।
योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥
उठिला तरंगु बैसे । पुढें आनुही नुमसे ।
ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ ७-१८६ ॥
कां नीद सरोनि गेली । जागृती नाहीं चेयिली ।
तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ ७-१८७ ॥
नाना येका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी ।
हे गमे तैशिया दृष्टी । दिठी सुतां ॥ ७-१८८ ॥
कां मावळो सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो ।
तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ ७-१८९ ॥
घेतला स्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला ।
तैसा दोहींसि सिवतला । नव्हे जो अर्थु ॥ ७-१९० ॥
कीं अवघांचि करणीं । विषयांची घेणी ।
करितांचि येके क्षणीं । जें कीं आहे ॥ ७-१९१ ॥
तयासारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो ।
येणें कां पाहों । न पाहों लाभे ? ॥ ७-१९२ ॥
कायी आपुलिये भूमिके । आरिसा आपुलें निकें ।
पाहों न पाहों शके । हें कें आहे ? ॥ ७-१९३ ॥
कां समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया ।
वांचूनि तयाप्रति तया । होआवें कां ? ॥ ७-१९४ ॥
सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे कवीं ।
जे उदोअस्तूंचीं चवी । स्वयें घेपे ? ॥ ७-१९५ ॥
कीं रसु आपणिया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? ।
हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ ७-१९६ ॥
तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हा नेणे ।
आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ ७-१९७ ॥
जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां ।
तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ ७-१९८ ॥
आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? ।
तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ ७-१९९ ॥ >हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें ।
बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ ७-२०० ॥
पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे ।
म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ ७-२०१ ॥
एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें ।
ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ ७-२०२ ॥
दिसत्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें ।
तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ ७-२०३ ॥
दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे ।
आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ ७-२०४ ॥
मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं ।
तरी जाली ते वायाणी । प्रतीति कीं ॥ ७-२०५ ॥
देखतांची आपणयातें । आलिये निदेचेनि हातें ।
तया स्वप्ना ऐसा येथें । निहाळितां ॥ २०६ ॥
निद्रिस्तु सुखासनीं । वाहिजे आनु वाहणीं ।
तो साच काय तेसणी । दशा पावे ? ॥ ७-२०७ ॥
कीं सिसेंवीण येक येकें । दाविलीं राज्य करिती रंकें ।
तैसींचि तियें सतुकें । आथी काई ? ॥ २०८ ॥
ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाई ।
तैसाची स्वप्नी कांहीं । न पविजेचि कीं ॥ ७-२०९ ॥
तान्हेलया मृगतृष्णा । न भेटलेया शिणु जेसणा ।
मा भेटलेया कोणा । काय भेटलें ॥ ७-२१० ॥
कीं साउलीचेनि व्याजें । मेळविलें जेणें दुजे ।
तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ ७-२११ ॥
तैसें दृश्य करूनियां । द्रष्ट्यातें द्रष्ट्या ।
दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ ७-२१२ ॥
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? ।
न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? ।
तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥
तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया ।
तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि कीं ना ? ॥ ७-२१५ ॥
म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां ।
आतां जालाचि दिठा । कां न करावा ॥ ७-२१६ ॥
नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त जालें ।
येणेंहि बोलें गेलें । दावणें वृथा ॥ ७-२१७ ॥
दोरासर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा ।
द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ ७-२१८ ॥
दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके ।
परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ ७-२१९ ॥
तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो ।
म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जही ॥ ७-२२० ॥
वावो कीर होये । तही दिसत तंव आहे ।
येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ ७-२२१ ॥
तरी आन आनातें । देखोन होय देखतें ।
तरी मानूं येतें देखिलें ऐसें ॥ ७-२२२ ॥
येथें देखोनि कां न देखोनि । ऐक्य कां नाना होऊनि ।
परि हा येणेंवाचूनि । देखणें असे ? ॥ ७-२२३ ॥
आरिशानें हो कां दाविलें । तरी मुखचि मुखें देखिलें ।
तो न दावी तरी संचलें । मुखचि मुखीं ॥ ७-२२४ ॥
तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं ।
ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥
जागृती दाविला । कां निदा हारविला ।
परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।
तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।
तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥
तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता ।
चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें ।
देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ ७-२३० ॥
दीपु दावी तयातें रची । कीं तेणेंची सिद्धि दीपाची ।
तैसी सत्ता निमित्ताची । येणें साच ॥ ७-२३१ ॥
वन्हीतें वन्हीशिखा । प्रकाशी कीर देखा ।
परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ? ॥ ७-२३२ ॥
आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें ।
देखिलें तरी स्वभावें । दृश्यही हा ॥ ७-२३३ ॥
म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणापें देखावया ।
निमित्त हा वांचुनियां । नाहींच मा ॥ ७-२३४ ॥
भलतेन विन्यासें । दिसत तेणेंची दिसे ।
हा वांचून नसे । येथें कांहीं ॥ ७-२३५ ॥
लेणें आणि भांगारें । भांगारचि येक स्फुरे ।
कां जे येथें दुसरें । नाहींचि म्हणोनि ॥ ७-२३६ ॥
जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं ।
म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥
हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो ।
लाभो कां दिठी पाहों । भलतैसा ॥ ७-२३८ ॥
परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि नाहीं ।
तैशा रीती भलतयाही । हाचि यया ॥ ७-२३९ ॥
आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो ।
परी हां वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ ७-२४० ॥
गंगा गंगापणें वाहो । कीं सिंधु होऊनि राहो ।
परी पाणीपणा नवलाहो । हें न देखो कीं ॥ ७-२४१ ॥
थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें ।
घृतपण नव्हे । अनारिसें ॥ ७-२४२ ॥
ज्वाळा आणि वन्हि । न लेखिजती दोन्ही ।
वन्हिमात्र म्हणोनि । आन नव्हेचि कीं ॥ ७-२४३ ॥
तैसें द्रश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा ।
पाहतां येकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥ ७-२४४ ॥
इये स्फूर्तीकडुनी । नाहीं स्फुर्तिमात्रवांचुनि ।
तरी काय देखोनि । देखतु असे ? ॥ ७-२४५ ॥
पुढें फरकें ना दिसतें । ना मगें डोकावी देखतें ।
पाहतां येणें ययातें । स्फुरद्रुपेंचि ॥ ७-२४६ ॥
कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनि सोनें पांघुरलें ।
दिठीचे पाय गुंतले । दिठीसीचि ॥ ७-२४७ ॥
श्रुतीसि मेळविली श्रुती । दृतीसि मेळविली दृती ।
कां जे तृप्तीसीचि तृप्ति । वेगारिली ॥ ७-२४८ ॥
गुळें गुळ परवडिला । मेरु सुवर्णें मढिला ।
कां ज्वाळा गुंडाळिला । अनळु जैसा ॥ ७-२४९ ॥
हें बहु काय बोलिजे । कीं नभ नभाचिया रिगे सेजे ।
मग कोणें निदिजे । मग जागे तें कोणें ॥ ७-२५० ॥
हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा ।
आणि न पाहतांहि अपैसा । पाहणेंचि हा ॥ ७-२५१ ॥
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये ।
अनुभऊ न लाहे । अंग मिरौ ॥ ७-२५२ ॥
म्हणोन ययातें येणें । ये परीचें पाहणें ।
पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ ७-२५३ ॥
किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे ।
न चेतुचि चेऊं बैसे । जयासि तो ॥ ७-२५४ ॥
स्वयें दर्शनाचिया सवा । अवघियाची जात फावां ।
परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ ७-२५५ ॥
न पाहतां आरिसा असो पाहे । तरी तेंचि पाहणें होये ।
आणि पाहणेन तरी जाये । न पाहणें पाहणें ॥ ७-२५६ ॥
भलतैसा फांके । परी येकपणा न मुके ।
नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥ ७-२५७ ॥
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ।
मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥
अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु ।
जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥
तैसा आवडतिये भूमिके । आरूढलियाही कौतुकें ।
परि ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ ७-२६० ॥
सिंधूची सींव न मोडे । पाणीपणा सळु न पडे ।
जरी मोडूत गाडे । तरंगांचे ॥ ७-२६१ ॥
रश्मि सूर्यींच आथी । परी बिंबाबहेरी जाती ।
म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥ ७-२६२ ॥
आणि पळहेच दोडा । न पडतां तढा ।
जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥ ७-२६३ ॥
सोनयाचा रवा । रवेपणाचा ठेवा ।
अवघेयाचि अवयवा । लेणें नोहे ॥ ७-२६४ ॥
न फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो ।
न ये मा पावों । उपमा काई ? ॥ ७-२६५ ॥
म्हणौनि इये आत्मलीळे । नाहीं आन कांटाळें ।
आतां ययाचिये तुळे । हाचि यया ॥ ७-२६६ ॥
स्वप्रकाशाचा घांसीं । जेवितां बहु वेगेंसी ।
वेंचेना परी कुसीं । वाखही न पडे ॥ ७-२६७ ॥
ऐसा निरुपमापरी । आपुलिये विलासवरी ।
आत्मा राणीव करी । आपुला ठाईं ॥ ७-२६८ ॥
तयातें म्हणिपें अज्ञान । तरी न्याया भरलें रान ।
आतां म्हणे तयाचें वचन । उपसावों आम्ही ॥ ७-२६९ ॥
प्रकाशितें अज्ञान । ऐसें म्हणणें हन ।
तरी निधि दावितें अंजन । न म्हणिजे काई ? ॥ ७-२७० ॥
सुवर्णगौर अंबिका । न म्हणिजे कय काळिका ? ।
तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥ ७-२७१ ॥
येहवीं शिवोनि पृथ्वीवरि । तत्त्वांच्या वाणेपरी ।
जयाचा रश्मिकरीं । उजाळा येती ॥ ७-२७२ ॥
जेणें ज्ञान सज्ञान होये । दृङ्मात्र दृष्टीतें विये ।
प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासी ॥ ७-२७३ ॥
तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें ।
ना तमें सूर्य मोटे । बांधतां निकें ॥ ७-२७४ ॥
`अ` पूर्वी ज्ञानाक्षरी । वसतां ज्ञानाची थोरी ।
शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ? ॥ ७-२७५ ॥
लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ? ।
आंतु बाहेरी सरिसें । करून घाली ॥ ७-२७६ ॥
म्हणोनि जग ज्ञानें स्फितें । बोलतां अज्ञानवादातें ।
विखुरली होती आतें । वाचेचिये ॥ ७-२७७ ॥
आखरीं तंव गोवधु । पुधारां अनृतवादु ।
मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ? ॥ ७-२७८ ॥
आणि अज्ञान म्हणणें । स्फुरत्से अर्थपणें ।
आतां हेंचि ज्ञान कोणे । मानिजे ना ? ॥ ७-२७९ ॥
असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें ।
आपणचि देखिजे । बहुये परी ॥ ७-२८० ॥
निर्वचितां जें झावळे । तेंचि कीं लाहे डोळे ? ।
डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥ ७-२८१ ॥
ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणें मी वियें ।
येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥ ७-२८२ ॥
तंव अज्ञान त्रिशुद्धि नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई ।
जे धर्मधर्मित्वें कंहीं । ज्ञानाज्ञान असे ? ॥ ७-२८३ ॥
कां जळां मोतीं वियें ? । राखोंडिया दीपु जिये ? ।
तरी ज्ञानधर्मु होये । अज्ञानाचा ॥ ७-२८४ ॥
चंद्रमा निगती ज्वळा ? । आकाश आते शिळा ? ।
तरी अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥ ७-२८५ ॥
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट ।
परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ ७-२८६ ॥
ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें ।
पुढती ज्ञान येकलें । अज्ञान नाहीं ॥ ७-२८७ ॥
म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा ।
ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपु ॥ ७-२८८ ॥
प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वचे घेईं चुकी ।
म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ ७-२८९ ॥
विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा ।
श्रुति काय वायसा । ढेंकरू देती ॥ ७-२९० ॥
यालागीं वस्तुप्रभा । वस्तुचि पावे शोभा ।
जात असे लाभा । वस्तुचिया ॥ ७-२९१ ॥
वांचून वस्तु यया । आपणपें प्रकाशावया ।
अज्ञान हेतु वांया । अवघेंचि ॥ ७-२९२ ॥
म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोण्हे परी न लाहों ।
अज्ञान कीर वावो । पाहों ठेलियाही ॥ ७-२९३ ॥
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा ।
रात्रीचिया घरा । गेलियाही ॥ ७-२९४ ॥
कां नीद खोळे भरिता । जागणें ही न ये हाता ।
येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ ७-२९५ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे अज्ञानखंडन नाम सप्तम प्रकरणं संपूर्णम् ॥

ज्ञानखण्डन

तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ ८-१ ॥
परी आम्हा आम्ही आहों । तें इअसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लजिजे ऐसा ॥ ८-२ ॥
हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥ ८-३ ॥
अहो आत्मेपणीं न संटो । स्वसंविति न घसवटो ।
आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥ ८-४ ॥
आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥ ८-५ ॥
आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो ।
तैं आमुतें न देखों । आम्हीपण ॥ ८-६ ॥
प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलावो ।
परी कैसेनिही विपावो । असणयाचा ॥ ८-७ ॥
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडू कासया ।
केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ॥ ८-९ ॥
अज्ञानचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥ ८-१० ॥
राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांदुन सूर्यासवें । शिणणें होय ॥ ८-११ ॥
म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ ८-१२ ॥
येहवीं तही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥ ८-१३ ॥
जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें ।
तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ ८-१४ ॥
कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये ।
दिठी अंधरें पाहे । तैं तेचि वृथा ॥ ८-१५ ॥
तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे ।
आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥ ८-१६ ॥
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ ८-१७ ॥
आणि जाणे तोचि नेणें । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असे जिणें । ज्ञानाज्ञाना ? ॥ ८-१८ ॥
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं संपूर्णम् ॥

जीवन्मुक्तदशाकथन

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठले । लोचनेसी ॥ ९-१ ॥
आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें ।
कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ ९-२ ॥
जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ ९-३ ॥
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर ।
जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ ९-४ ॥
दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा ।
घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ ९-५ ॥
चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ ।
रस झाले सकळ । रसनावंत ॥ ९-६ ॥
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ ९-७ ॥
सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी ।
पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ ९-८ ॥
तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी ।
अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ ९-९ ॥
म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे ।
सैंघ घेती धांवे । समोरही ॥ ९-१० ॥
परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे ।
तैसे झाले धांवे । वृत्तीचे या ॥ ९-११ ॥
नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण ।
घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥
वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ ।
तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ ९-१३ ॥
हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु ।
जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ ९-१४ ॥
तही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें ।
तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ ९-१५ ॥
म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात ।
घ्यावया जेथ । उजू होती ॥ ९-१६ ॥
तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे ।
मग असतेंचि आहे । संबंधु ना ॥ ९-१७ ॥
जिये पेरीं दिसती उशीं । तिये लाभती कीं रसीं ।
कांति जेवीं शशीं । पुनिवेचिया ॥ ९-१८ ॥
पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं झालें वरिषणें ।
विषयां करणें । भेटती तैशीं ॥ ९-१९ ॥
म्हणोन तोंडाआड पडे । तेंहि वाचा वावडे ।
परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ ९-२० ॥
व्यापाराचे गाडे । मोडतांहि अपाडे ।
अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥ ९-२१ ॥
पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें ।
परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥ ९-२२ ॥
तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया ।
शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥ ९-२३ ॥
स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा ।
उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ ९-२४ ॥
तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? ।
तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ ९-२५ ॥
चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ।
विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ ९-२६ ॥
प्रत्याहारादि अंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं ।
तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ ९-२७ ॥
येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी वाधावणें ।
आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ ९-२८ ॥
द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ ९-२९ ॥
कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा ।
झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ ९-३० ॥
घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥
तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ।
ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ ९-३२ ॥
आठवु आणि विसरु । तयातेंही घेऊं नेदी पसरु ।
दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ ९-३३ ॥
झाला स्वेच्छाचि विधि । स्वैर झाला समाधि ।
दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ ९-३४ ॥
झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥
भलतेउनि देवें । भलतेन भक्त होआवें ।
बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ ९-३६ ॥
देवाचिया दाटणी । देऊळा झाली आटणी ।
देशकाळादि वाहाणीं । येईच ना ॥ ९-३७ ॥
देवीं देवोचि न माये / मा देवी कें अन्वयो आहे ? ।
येथ परिवारु बहूये । अघडता कीं ॥ ९-३८ ॥
ऐसियाहि स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठलीं श्रद्धा ।
तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ ९-३९ ॥
अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा ।
नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ ९-४० ॥
आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें ।
अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ ९-४१ ॥
पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया ।
परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥ ९-४२ ॥
देव देऊळ परिवारु । कीजे कोरुनि डोंगरु ।
तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥ ९-४३ ॥
अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे ।
केलें देवपण तैसें । दोहीं परी ॥ ९-४४ ॥
अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां ।
मा अखतीं काय आतां । पुजो जावी ॥ ९-४५ ॥
दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी ।
हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥ ९-४६ ॥
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं लेकां ।
तही तो असिका । तियाचि कीं ना ॥ ९-४७ ॥
आगीपण आगी । असतचि असे अंगीं ।
मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥ ९-४८ ॥
म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? ।
ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥
अतां भक्ति अभक्ति । झालें ताट एके पातीं ।
कर्माकर्माचिया वाती । काल्हावूनियां ॥ ९-५० ॥
म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥
ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती ।
मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ ९-५२ ॥
घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय ।
शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ ९-५३ ॥
चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ।
नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ ९-५४ ॥
येहवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।
भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥
ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं ।
देवभक्ता दोही । एकुचि पाडू ॥ ९-५६ ॥
आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे ।
तेणें उदळतां दाटे । आपणपांचि ॥ ९-५७ ॥
ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं ।
तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥ ९-५८ ॥
कर्माचा हातु नलगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे ।
ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥ ९-५९ ॥
निफजे ना निमे । आंगें आंग घुमे ।
सुखा सुख उपमे । देववेल यया ॥ ९-६० ॥
कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म ।
योगज्ञानादिविश्राम । भूमिके हे ॥ ९-६१ ॥
आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले ।
होते तेही आटले । हरिहर येथें ॥ ९-६२ ॥
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।
ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी ।
टाकली निदैजोनी । परा येथें ॥ ९-६४ ॥
शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि ।
घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥ ९-६५ ॥
चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें ।
आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ ९-६६ ॥
आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें ।
हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ ९-६७ ॥
कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी ।
कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ ९-६८ ॥
गुरुत्वें जेवढा चांगु । तेवढाचि तारूनि लघु ।
गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥ ९-६९ ॥
शिष्यां देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे ।
तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ ९-७० ॥
किंबहुना ये दातारा । तूं याचा संसारा ।
वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ९-७१ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥

ग्रंथपरिहार

परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १०-१ ॥
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ १०-२ ॥
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें ।
कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागु ॥ १०-३ ॥
दिवा जो उजेडु । तो घराचाची सुरवाडू ।
गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ १०-४ ॥
अगाधेंहि उचंबळती । ते चंद्रीचि ना शक्ती ? ।
वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ १०-५ ॥
म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य ।
वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥ १०-६ ॥
आणि हा येवढा ऐसा । परिहारु देवू कायसा ।
प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥ १०-७ ॥
आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रगटची असे ठायीं ।
मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥ १०-८ ॥
नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ।
तरी काय जनीं जन । दिसते ना ? ॥ १०-९ ॥
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां ।
कोण्ही नहोनि आइता । सिद्धांत हा ॥ १०-१० ॥
ययापरौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं ।
आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ १०-११ ॥
तही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो ।
तही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ १०-१२ ॥
पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची ।
म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ १०-१३ ॥
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलूनियां ।
ऐसें नाहीं आपसया । प्रकाशुचि ॥ १०-१४ ॥
आणि पूर्णअहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों ।
मा लोपलों ना प्रगटलों । कोणा होऊनी । १०-१५ ॥
आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥ १०-१६ ॥
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंहि मौन करी ।
हे पाणियावरी मकरी । रेखिली पां ॥ १०-१७ ॥
एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ।
देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ १०-१८ ॥
ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत ।
सेंवोनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ १०-१९ ॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ ।
परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥ १०-२० ॥
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे ।
हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ १०-२१ ॥
प्रिया सावायिली होये । तै अंगीचे अंगीं न समाये ।
येहवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ १०-२२ ॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला ।
गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ १०-२३ ॥
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ १०-२४ ॥
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद ।
अनुभामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ १०-२५ ॥
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं ।
कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ १०-२६ ॥
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी ।
मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥ १०-२७ ॥
तैसें जे या अखरा । भेटती गाभारां ।
ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ १०-२८ ॥
जैशा आकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ १०-२९ ॥
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी ।
किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥ १०-३० ॥
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥ १०-३१ ॥

॥ इति श्रीसिद्धानुवाद अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥