कोणास ठाऊक म्हणावे
अस्तित्व त्या थेंबाचे
ढगांवरती स्वार त्या
बागडणा-या जलाचे ।।१।।
कोसळतांना त्याला
भय का न वाटावे
खा-या पाण्यावर जाऊन
अस्तित्व त्याचे का मिटावे ? ।।२॥
चातक पक्षालाही
उत्तर कसे मिळावे?
एकाच थेंबात त्याने
तृप्त कसे व्हावे ? ।।३।।
काळयाशार मातीनेही
स्वप्नात का रंगावे?
हिरव्यागार शालींच्या
मोहात का पडावे ?।।४।।
प्राणवायुलाही का
दोस्त त्याने करावे?
बागडणा -या जलचरांच्या
श्वासात का अडकावे ? ।।५।।
समुद्रातल्या शिंपल्यानेही
का आतुर इतके व्हावे ?
उदरातल्या मोत्याच्या
प्रेमात का पडावे ? ।।६।।
कोसळतांना पाहून त्याला
दुषणे का आता द्यावी ?
वरूनाच्या भक्तांनीही
मान जरा झुकवावी ।।७।।
डॉ.सायली ठाकरे