बोधकथा

श्री.विश्वनाथजी वारींगे महाराज

‘ भुतांची दया हे भांडवल संता ’

संत हे दयाळू असतात हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात  ”दया”   हे  संतांचे भांडवल आहे .

एक संत आपल्या  शिष्यांसह नदी पार करण्यासाठी  होडीत बसून प्रवास करत होते . होडी  पलीकडच्या तिरावर पोहचणार इतक्यात संतांचे लक्ष गेले एक विंचू नदीतून वाहत चालला होता. त्या माहात्म्यांना दया आली त्यांनी होडी थांबवायला  सांगितली आणि बाहेर हात काढून त्या विंचवाला आपल्या हातावर घेऊन काढू लागले,हातावर घेताच विंचवाने आपला स्वभावधर्म  दाखवला,विंचवाने संतांच्या हाताला नांगी मारून दंश केला. विंचू खाली नदीत  पडला, संताने त्याला परत हात घालून वाचवायचा प्रयत्न केला ,परंतु त्याने परत त्या महात्म्याच्या हाताला दंश केला .एक शिष्याला राग आला त्याने माहात्म्याना म्हटले ” बाबा सोडा त्या विंचवाला , आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करीत आहात आणि तो आपल्याला नांगी मारून दंश करत आहे.” संत शांतपणे म्हणाले ” बेटा हा एक सामान्य जीव आहे ,दंश करणे हा त्याचा गुण आहे ,मग सामान्य असलेला हा जीव जर त्याचा गुण सोडत नसेल तर ,मी माणूस आहे ,त्यातच ज्ञानी आहे दुःखितावर दया  करणे हा माझा धर्म आहे,विंचू जर त्याच स्वभाव धर्म सोडत नसेल तर मी माझा स्वभाव धर्म का सोडू ?

तात्पर्य : संत हे दयाळू असतात म्हणून जगातील लोकांनी संताना कितीही छळले तरी संत त्यांना उपदेश करून सन्मार्गाला लावण्याचे कार्य सतत करीत असतात .

परमेश्वर दयाळू आहे

एका आश्रमात एक साधू महाराज राहात होते,एकदा जोराचा पाऊस सुरु होता, विजांचा कडकडाट होत होता, साधूने पाहिले की आश्रमाच्या बाहेर आश्रमाच्या आडोशाला कोणीतरी उभा आहे, साधु बाहेर आले आणि त्यांनी बाहेर उभा असलेल्या व्यक्तीला विचारले ” कोण आहेस तू ? आणि इथे का उभा राहिला आहेस ?” त्या व्यक्तीने सांगितले ‘ मी चोर आहे,चोरी करण्यासाठी निघालो होतो,पण पाऊस आला आहे म्हणून आपल्या आश्रमाचा आश्रय घेतला आहे, पाऊस थांबला की मि जाईन. हे ऐकताच साधू म्हणाले ” तू इथुन लवकर जा,तुझ्यामुळें लोक मला दोष देतील,ही सज्जन माणसाची झोपडी आहे “. चोर हात जोडून विनवणी करत होता,पण साधू महाराज त्याला जायला सांगत होते.
तेवढ्यात साधू महाराजांच्या कानात भगवंताचे शब्द पडले, साधूला ईश्वराची वाणी ऐकू आली, देव म्हणाले ‘ अहो महाराज या चोराला थांबू द्या,कारण याचा जेव्हा जन्म झाला ,तेव्हाच मला माहित होते हा चोर होणार, चोरी करणार, तरी ही मी याला पन्नास वर्षे सांभाळला, तुम्ही फक्त थोडा वेळ त्याला आश्रय द्या.”

तात्पर्य : आपण कसे ही वागलो तरी ईश्वर आपला सांभाळ करतो,तो अतिशय दयाळू आहे.

शत्रु ला साहाय्य करण्याचा विचार ही मनात आणू नका.

एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्‍हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्‍हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्‍याला नावं ठेवायला जागा नाही.’

तात्पर्य:  शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.